नीरा खोऱ्यातील धरणात मुबलक पाणी तरीही उजवा कालव्यावरील पिके करपली 

Abundant water in the Nira Valley dam still planted crops on the right canal
Abundant water in the Nira Valley dam still planted crops on the right canal

लवंग (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : भाटघर, वीर, नीरा-देवधर ही धरणे यंदा शंभर टक्के भरून उशिरापर्यंत ओसंडून वाहिली. तरीही कालव्याची वहन क्षमता कमी असल्यामुळे नीरा उजवा कालव्यावर भिजणाऱ्या पिकांना दुसऱ्या आवर्तनाचे तब्बल दोन ते अडीच महिने पाणी न मिळाल्याने पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. तर काही वाळून गेली आहेत. नीरा उजव्या कालव्याची वाहन क्षमता कमी असल्याने दोन आवर्तनातील अंतर वाढत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. 
पाणीवाटपाच्या योग्य नियोजनाचा अभाव, पाणी वाटपासाठी खात्याकडे कर्मचारी कमी, उन्हाळी हंगामाचे पाणी उशिरा चालू करणे, अशा अनेक कारणाने दरवर्षी शेतकऱ्यांना उशिरा पाणी मिळते. परंतु यंदा वेळेवर उन्हाळी हंगामाचे पाणी चालू करूनही पहिले आवर्तन झाल्यानंतर दोन-अडीच महिने होऊन गेले तरी अद्याप दुसरे आवर्तन पूर्ण क्षमतेने चालू करण्यास पाटबंधारे खात्याला अपयश येत आहे. उन्हाच्या कडाक्‍यामुळे पिके लवकर पाण्याला आली आहेत. वीर धरणावरून फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्‍यांना जाणाऱ्या उजव्या कालव्याची वहन क्षमता कमी असल्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही दोन ते अडीच महिने पाणी उशिरा मिळते. तसेच पूर्वी भिजणारे क्षेत्र कमी होते. परंतु, आता सात नंबर फॉर्मवर भिजणारे क्षेत्र वाढले आहे पूर्वी हे क्षेत्र चारही तालुक्‍यांत मिळून फक्त 65 हजार हेक्‍टर होते. तेच आता दोन लाख 47 हजार हेक्‍टर इतके झाले आहे. त्यामुळेही दोन आवर्तनातील अंतर वाढत असल्याचे पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शासनाने या कालव्याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा धरणे भरली तरी उन्हाळ्यात दरवर्षी "येरे माझ्या मागल्या' प्रमाणे उशिरा पाणी मिळण्याने पिके वाळणार असल्याचे सांगितले जाते. नीरा उजवा कालव्याची वहन क्षमता एक हजार 600 क्‍युसेक आहे. या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम चालू आहे. हे करत असताना शासनाने या कालव्याची क्षमता दोन हजार क्‍युसेकपर्यंत वाढवण्यासाठीचा प्रकल्प हाती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुक्‍यातील आमदार आणि खासदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन शेतकऱ्यांकडून या लोकप्रतिनिधींना केले जात आहे. परंतु लोकप्रतिनिधीही त्यादृष्टीने प्रयत्न करत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

गतवर्षीप्रमाणेच स्थिती 
यावर्षी धरणात भरपूर पाणीसाठा आहे. तरीही पिकांची परिस्थिती पाहिली तर गतवर्षीच्या दुष्काळाप्रमाणेच आहे. यंदा जूनअखेर कालव्याचे पाणी चालू राहील असे अधिकारी सांगत आहेत. या उन्हाळी हंगामासाठी दोन आवर्तने मंजूर आहेत. माळीनगर पाणीपुरवठा सहकारी सोसायटीचे दुसऱ्या आवर्तनानंतरही पाणी शिल्लक राहिले तर त्यांचा तिसऱ्या आवर्तनावर हक्क असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com