भीमा नदीतून वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त 

संतोष पाटील 
Tuesday, 29 September 2020

पोलिसांनी कारवाई करून वाळूने भरलेल्या टिप्परची वाळूसह किंमत 18 लाख 23 हजार 500 रुपये, दोन ट्रॅक्‍टरच्या ट्रॉली व वाळूसह किंमत आठ लाख 67 हजार 500 रुपये व दुसऱ्या मोकळ्या टिप्परची किंमत 18 लाख असा एकूण 44 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

टेंभुर्णी (सोलापूर) : भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती विक्रीसाठी कुर्डूवाडी येथे घेऊन जाणारे दोन टिप्पर व एक ट्रॅक्‍टर अशा तीन वाहनांवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने कारवाई करून सुमारे 44 लाख 92 हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
या गुन्ह्यात शुभम लहू आरडे (वय 21, रा. शहा, ता. इंदापूर), ज्योतीराम राजाराम खुळे (वय 24, रा. खुळे वस्ती, टेंभुर्णी) गोविंद सिद्धेश्वर घुगे (वय 20, रा. लऊळ, ता. माढा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी विशेष पोलिस पथक नियुक्त केले आहे. पोलिस निरीक्षक विनय बहारे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार राठोड, पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय झिरपे, घुले, जाधव हे विशेष पोलिस पथक रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर रांझणी-भीमानगर फाट्याजवळ गस्त घालत आले असता कमानीच्या आतील बाजूस वाळूने भरलेले दोन टिप्पर, एक ट्रॅक्‍टर अशी तीन वाहने जात असताना दिसली. त्यामुळे या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी ती वाहने थांबवून तपासणी केली असता त्यांना टिपर (एमएच 46/एफ 3397) मध्ये साडेतीन ब्रास वाळू तर ट्रॅक्‍टर (एमएच 42/पी 5750) च्या ट्रॉलीमध्ये अडीच ब्रास वाळू आढळून आली. याचवेळी टिपर (एमएच 45/1392) च्या चालकाने पोलिसांना पाहून कारवाईच्या भीतीने टिप्परमधील वाळू खाली करून रिकामा टिप्पर रोडवर उभा केला. पथकातील पोलिसांनी कारवाई करून वाळूने भरलेल्या टिप्परची वाळूसह किंमत 18 लाख 23 हजार 500 रुपये, दोन ट्रॅक्‍टरच्या ट्रॉली व वाळूसह किंमत आठ लाख 67 हजार 500 रुपये व दुसऱ्या मोकळ्या टिप्परची किंमत 18 लाख असा एकूण 44 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 
पथकातील पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय झिरपे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून तिन्ही वाहनाच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार स्वामीनाथ लोंढे हे तपास करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on vehicles pumping sand from Bhima river in madha taluka