आदर्श गाव ! सलग 45 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक नाही; मळेगाव ठरतंय राज्यातील रोल मॉडेल 

malegaon
malegaon

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील मळेगावने सलग 45 वर्षे म्हणजे नऊ वेळा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून राज्यात एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी गावाची सोसायटी निवडणूक देखील अनेक वर्षांपासून बिनविरोध होत आहे. बार्शी - तुळजापूर रस्त्यावर वसलेलं मळेगाव बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी रोड मॉडेल ठरले आहे. 

राज्यावर आलेलं कोरोना महामारीचं भीषण संकट, अतिवृष्टीरूपी अस्मानी व सुलतानी संकट यामुळे राज्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशातच राज्याच्या विविध भागांत ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून, अनेक ग्रामपंचायतींनी गावच्या विकासासाठी आपापसातील मतभेद, हेवेदावे, भांडणतंटे व वाद विसरून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस शासन, लोकप्रतिनिधी व समाजातील दानशूर मंडळींनी गावच्या विकासासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवली आहेत. त्यास राज्यभरातून कसा प्रतिसाद मिळतो तो येत्या काही दिवसांत दिसूनही येईल. अनेक ग्रामपंचायतींनी बैठका, गाटी-भेटी घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यात मळेगाव हे ग्राम गेल्या 45 वर्षांपासून राज्यासाठी रोड मॉडेल ठरले आहे. 

हेही वाचा : पानगाव ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम रद्द ! आरक्षण सदोष असल्याचा ठपका 

गावात असलेल्या एकीने माळेगावने जलयुक्त शिवारमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून वेगळाच नावलौकिक मिळवला आहे. मळेगाव ग्रामपंचायतीने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील विविध पुरस्काही प्राप्त केले आहेत. यात जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक, महात्मा फुले जलमित्र पुरस्कार -2015-16, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 : सन्मानपत्र व आदर्श स्मार्ट ग्राम पुरस्कार पटकावत गावातील असलेल्या एकीचे व सामंजस्याचे एक उदाहरण राज्यासमोर ठेवले आहे. 

मळेगाव ही श्री नर्मदेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, कृषी, राजकीय, औद्योगिक व प्रशासकीय आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीमुळे मळेगाव नगरी राज्यात अग्रेसर ठरली आहे. गावच्या विकासासाठी लहान- मोठा असा कोणताही भेदभाव न करता गावातील प्रत्येक नागरिक तन - मन - धनाने गावाच्या विकासात करीत असलेली सेवा हे गावचे गुपित आहे. 

आयएसओ मानांकन ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा, स्मार्ट ग्राम योजना, सर्व समाजासाठी एकच स्मशानभूमी, गावात दारूबंदी, निर्मल ग्राम योजना, डिजिटलमुक्त गाव, सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण गावात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पाणी प्रकल्प, वनराई बंधारे, वॉटर कप स्पर्धा, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण शिबिरे, नाना - नानी पार्क, स्मशानभूमी सुशोभीकरण, एलईडी दिवे, गावात झालेले सुशोभीकरण आदी कामांमुळे मळेगाव ग्रामपंचायत इतर ग्रामपंचायतींपेक्षा विकासकामात सरस ठरली आहे. 

गावचे आजी- माजी सरपंच, आजी- माजी सैनिक, ग्रामपंचायतीचे व सोसायटीचे सदस्य, आजी- माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तंटामुक्त समिती, गावचे पोलिस पाटील, विविध क्षेत्रात कार्य करणारे पदाधिकारी, सामाजिक संस्था, गावातील मंडळे, सामाजिक कार्यकर्ते व मळेगाव ग्रामस्थ या सर्वांचे गावाविषयी असलेले प्रेम व कामाची धडपड आदर्शवत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com