वडिलांच्या मृत्यूनंतर विधीची तयारी करणाऱ्याच्या घरात चोरट्याचा डल्ला ! चाकूचा धाक दाखवून चार लाख लुटले 

तात्या लांडगे
Thursday, 5 November 2020

होटगी रोडवरील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये एका घरातून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अमित रमेश राडकर यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

सोलापूर : होटगी रोडवरील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये एका घरातून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अमित रमेश राडकर यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

वडिलांच्या निधनानंतर अमित यांची पत्नी विधीची तयारी करत होत्या. त्यानिमित्ताने त्या घराचा मुख्य दरवाजा पुढे करून शेजारच्या बिल्डिंगमध्ये गेल्या. अमित हे त्या वेळी झोपेत होते. ही संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरामधून एक लाख 20 हजार रुपयांचा लॅपटॉप, एक लाख रुपयांची सोन्याची चेन आणि दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व वीस हजार रुपये चोरून नेले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. बेंबडे हे करीत आहेत. 

चाकूचा धाक दाखवून पाच लाख रुपये लंपास 
कार चालकाला चाकूचा धाक दाखवून चार लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना समर्थ हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडवर घडली आहे. याप्रकरणी चार अनोळखी व्यक्‍तींविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मयूर गोविंद बागल (रा. धानेश्‍वरी नगर, वसंत विहार) हे त्यांच्या बागल ट्रेडिंग कंपनीतून बॅग घेऊन (एम. एच. 45 ए.डी. 7855) आपल्या कारमधून घरी निघाले होते. त्यानंतर दुचाकीवरून आलेली व्यक्‍ती कारजवळ येऊन काचेवर हात मारला. त्याने कार थांबविण्याचा इशारा केला. मयूर यांनी गाडी थांबवून काच खाली केली, त्या वेळी त्याने तुला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही, असे म्हणून चाकूचा धाक दाखविला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक श्री. देशमाने हे पुढील तपास करीत आहेत. 

पोलिस आयुक्‍तांचा दणका; तीन सराईत गुन्हेगारांवर मोक्का 
विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत संजय ऊर्फ लखन गोकूळ परदेशी व त्याचे साथीदार सोमनाथ ऊर्फ सोमा सदाशिव गायकवाड आणि सोनू ऊर्फ ध्रुव सदाशिव मोरे या तिघांविरुद्ध पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मागील अकरा वर्षात 29 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शहर व परिसरात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, पोलिसांवर हल्ला करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, अस्तित्व लपवणे, जनतेच्या संपत्तीची मोडतोड करून नुकसान करणे, परिसरात दहशत माजवणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे व विजापूर नाका पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे व सध्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Adarsh MLA Gram Yojana, the MLAs did not select the village itself