
करमाळा शहरातील मेनरोड, वेताळ पेठ, सुमंत नगर, मंगळवार पेठ, सिध्दार्थनगर, नागोबा मंदिर भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे.
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात आज एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी नवीन सहा कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात तीन महिला व तीन पुरुष असून करमाळा शहरातील आहेत. आतापर्यंत एकूण 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. करमाळा शहर व तालुक्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर नागरिकांनी गर्दी टाकण्याचे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती महसूल विभागात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत होती. त्यामुळे करमाळा तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे व तलाठी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार समीर माने यांनी सांगितले की, करमाळा शहर व तालुक्यातील 120 जणांची तपासणी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यातील 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील करमाळा शहरातील एका व्यक्तीचा बार्शी येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला असून त्या व्यक्तीला कोरोना संसर्ग व पूर्वीचे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार होते. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. लग्न सोहळे व इतर कार्यक्रम टाळावेत. अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या तालुक्यात वाढविण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी, मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संपादन : वैभव गाढवे