मकाई कारखाना वाचवण्यासाठी आदिनाथ कारखाना ठेवला गहाण; कृती समितीच्या बैठकीत आरोप 

अण्णा काळे 
Wednesday, 28 October 2020

डॉ. वसंत पुंडे म्हणाले, जर वेळेवर साखर विक्री केली असती तर कारखान्यावर जप्तीची वेळ आली नसती. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे कारखाना अडचणी आला आहे. त्यामुळे कारखान्यावर 10 ते 12 कोटी व्याज वाढले. कामगारांचा पगारीचा प्रश्न हा चर्चा करून सुद्धा मिटवता आला असता. 

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना हे दोन्ही सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता असून दोन्ही कारखान्यावर कर्ज असताना आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देत असाल तर मकाई साखर कारखाना का भाडेतत्त्वावर दिला जात नाही? मकाई वाचवण्यासाठी बागल आदिनाथ गहाण ठेवत आहेत असल्याची टिका, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजी देशमुख यांनी दिली आहे. 
करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात आदिनाथ बचाव कृती समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी देशमुख बोलत होते. ता. 6 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा सभासदांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, आदिनाथचे माजी संचालक डॉ. वसंत पुंडे, माजी संचालक संतोष खाटमोडे, माजी संचालक दत्ता गिरमकर, डॉ. गोरख गुळवे, ऍड. लुणावत, उदयसिंग मोरे पाटील, सुहास गलांडे, अण्णा सुपनवर उपस्थित होते. 
यावेळी शहाजी देशमुख म्हणाले, 128 कोटी 26 लाख आदिनाथ कारखान्यावर शिखर बॅंकेचे कर्ज आहे. त्यात 100 कोटीची साखर शिल्लक आहे. फक्त 28 कोटीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर का दिला जातोय? 27 कोटी साठी आदिनाथची 500 कोटीपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गहाण ठेवली जात आहे. आदिनाथपेक्षा जास्त कर्ज मकाईवर असताना मकाई मात्र सुरू होतो. आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा असेल तर मकाई का नाही? कामगारांच्या पगारी व ऊस वाहतूक दाराचे पैसे देण्याचे असतील तर आदिनाथ व मकाई दोन्ही कारखान्यातील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासनाच्या ताब्यात कारखाना देऊन कामगारांच्या पगारी द्याव्यात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करवा, पण तो भाड्याने देऊ नये, असेही ते म्हणाले. 
डॉ. वसंत पुंडे म्हणाले, जर वेळेवर साखर विक्री केली असती तर कारखान्यावर जप्तीची वेळ आली नसती. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे कारखाना अडचणी आला आहे. त्यामुळे कारखान्यावर 10 ते 12 कोटी व्याज वाढले. कामगारांचा पगारीचा प्रश्न हा चर्चा करून सुद्धा मिटवता आला असता. सुहास गलांडे म्हणाले, शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. सुरुवातीला आदिनाथ कारखान्यातील साखर पोत्याचे पूजन पवार साहेबांनी केले होते. तसेच कारखाना भाडेतत्त्वावर न देता प्रशासनाच्या ताब्यात देऊन प्रशासनाने चालवावा, असे आदेश देव्यात आणि साखर पोत्याचे पुजन आपणच करून कारखान्याला गतवैभव प्राप्त करून द्यावे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adinath factory mortgaged to save makai factory allegations in action committee meeting