
या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 235 मतदान केंद्रे आहेत. मतदान कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीन अशी 280 मतदान पथके, 244 शिपाई, 10 क्षेत्रीय अधिकारी, 18 निवडणूक निर्णय अधिकारी, 49 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असे 1241 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर व नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी दिली.
तालुक्यात डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या 49 गावांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. तालुक्यातील गोरडवाडी, मिरे, गिरझणी व बाभूळगाव या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या 40 व अन्य ग्रामपंचायतींच्या 50 अशा एकूण 90 जागा बिनविरोध झाल्या आहेत. महाळुंग ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने तेथील 17 जागा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित 44 ग्रामपंचायतींच्या 452 जागांसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान होत आहे. त्यासाठी 913 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 235 मतदान केंद्रे आहेत. मतदान कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक एक, दोन, तीन अशी 280 मतदान पथके, 244 शिपाई, 10 क्षेत्रीय अधिकारी, 18 निवडणूक निर्णय अधिकारी, 49 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असे 1241 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान अधिकाऱ्यांना दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मतदान यंत्रामध्ये मतपत्रिका लावून ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी मतपत्रिकेचा रंग गुलाबी, अनुसूचित जमातीसाठी हिरवा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पिवळा तर सर्वसाधारणसाठी पांढरा आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी 30 एसटी बस, 10 जीप, 10 साध्या जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. 14) निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांचे सहकार्य लाभत आहे. सोमवारी (ता. 18) सकाळी 10 वाजता नवीन शासकीय धान्य गोदाम, म्हसवड रोड, माळशिरस येथे मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल