सांगोला तालुक्‍यात 265 मतदान केंद्रांवर 1450 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती ! 

दत्तात्रय खंडागळे 
Thursday, 14 January 2021

सांगोला तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींपैकी पाच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती सोडून उर्वरित 56 ग्रामपंचायतींच्या 539 जागांसाठी 265 मतदान केंद्रांवर 1 लाख 64 हजार 044 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 1 हजार 450 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींपैकी पाच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती सोडून उर्वरित 56 ग्रामपंचायतींच्या 539 जागांसाठी 265 मतदान केंद्रांवर 1 लाख 64 हजार 044 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 1 हजार 450 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी दिली. 

सांगोला तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींपैकी मेथवडे, वाटंबरे, तिप्पेहाळी, गायगव्हाण, चोपडी या पाच ग्रामपंचायती अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध झाल्या आहेत. तर इतर 19 ग्रामपंचायतींचे 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शुक्रवारी (ता. 15) 56 ग्रामपंचायतींच्या 539 जागांसाठी 1210 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया 265 मतदान केंद्रांवर पार पडणार असून, यासाठीची पूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 265 केंद्राध्यक्ष, 265 सहाय्यक केंद्राध्यक्ष, 530 मतदान अधिकारी, 265 शिपाई तसेच 25 राखीव केंद्राध्यक्ष, 25, राखीव सहाय्यक केंद्राध्यक्ष, 50 राखीव मतदान अधिकारी, 25 राखीव शिपाई अशी 1450 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रावर 265 कंट्रोल युनिट, 268 बॅलेट युनिट मशिन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मतदान केंद्रावर मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतदान प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी कंट्रोल युनिट, बॅलेट मशिनचे 25 सेट राखीव ठेवण्यात आले आहेत. 

मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी, कंट्रोल युनिट, बॅलेट मशिन पोच करण्यासाठी 35 बस, 8 जीप अशी 43 वाहनांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी 4 झोनल ऑफिसर यांच्यासाठी वाहनांची सोय केली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जीपीएस यंत्रणेसह तीन भरारी पथके तैनात केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे. 

पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त 
तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 265 मतदान केंद्रांवर दोन पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक, 165 पोलिस कर्मचारी, 152 होमगार्ड अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा 325 बंदोबस्त राहणार आहे. जवळा, जुनोनी, नाझरे, महूद, सांगोला या झोनलमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी पाच फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून तालुक्‍यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 484 जणांवर पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration has completed preparations for the Gram Panchayat elections in Sangola taluka