पंढरपूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ! 331 मतदान केंद्रांवर 1736 अधिकारी व कर्मचारी रवाना 

अभय जोशी 
Thursday, 14 January 2021

ग्रामपंचायती निवडणुका या ग्रामपातळीवर संवेदशील असतात. निवडणुका शांततेत पार पाडव्यात यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. तसेच मतदारांनी निर्भीड व नि:पक्षपणे मतदान करावे, असे आवाहनही श्री. कदम यांनी या वेळी केले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 71 ग्रामपंचायतींसाठी 331 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी उद्या (ता. 15) सार्वत्रिक मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 1 हजार 736 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, निवडणूक अधिकारी, कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाले असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विवेक सांळुखे यांनी दिली. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी तालुक्‍यात 72 ग्रामपंचायतींपैकी जैनवाडी ग्रामपंचायतीसह 17 मतदान केंद्रांतील 15 प्रभागांमधील 100 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 657 उमेदवार निवडणूक लढविणार असून, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 लाख 4 हजार 416 पुरुष मतदार व 92 हजार 18 स्त्री मतदार तसेच इतर 1 असे एकूण 1 लाख 96 हजार 435 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नियुक्त निवडणूक अधिकारी व कर्मचारी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथून गुरुवारी (ता. 14) मतदान साहित्य घेऊन रवाना झाले आहेत. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी 30 एसटी बस व 27 जीपची व्यवस्था करण्यात आली होती. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी तालुक्‍यातील सहा गावे अतिसंवेदनशील असून त्यामध्ये नारायण चिंचोली, कासेगाव, खर्डी, अजनसोंड, गोपाळपूर व त. शेटफळ तसेच गादेगाव, वाखरी, भंडीशेगांव, भाळवणी, धोंडेवाडी, उपरी, पिराची कुरोली, सोनके, तिसंगी, रोपळे, चळे, रांझणी आणि खरसोळी ही 13 गावे संवेदनशील आहेत. यासाठी आवश्‍यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीत मतदान होत असल्याने मतदान केंद्रांवर आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार सांळुखे यांनी सांगितले. 

ग्रामपंचायती निवडणुका या ग्रामपातळीवर संवेदशील असतात. निवडणुका शांततेत पार पाडव्यात यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. तसेच मतदारांनी निर्भीड व नि:पक्षपणे मतदान करावे, असे आवाहनही श्री. कदम यांनी या वेळी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration has made all preparations for the Pandharpur Gram Panchayat elections