रुग्ण सेवेसाठी सरसावले डॉक्‍टर असलेले प्रशासकीय अधिकारी 

भारत नागणे 
Friday, 19 June 2020

म्हणून घेतला रुग्णसेवेचा निर्णय 
सध्या कोरोना पार्श्‍वभूमीवर आपल्याकडे असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा समाजासाठी फायदा व्हावा, यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात डॉक्‍टर असलेले प्रशासकीय अधिकारी प्रथमच कोरोना पार्श्‍वभूमीवर सेवेसाठी पुढे आल्याने त्यांचे सर्वस्तरातून स्वागत आणि कौतुक होत आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना पार्श्‍वभूमीवर मागील तीन महिन्यांपासून पोलिस, वैद्यकीय अधिकारी, नर्स, डॉक्‍टर्स यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा संकटकाळात नागरिकांना वैद्यकीय सेवा कमी पडू नये याकरिता शासन प्रयत्न करीत आहे. कोरोना काळात खासगी डॉक्‍टरांनी वैद्यकीय सेवा द्यावी, अशी विनंती शासन पातळीवरून केली जात आहे. अशातच पंढरपूरचे डॉक्‍टर असलेले दोन प्रशासकीय अधिकारी स्वतःहून वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुढे आले आहेत. पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे आणि तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी आपल्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सांभाळून दररोज एक तास वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक केले जात आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे हे मागील एक ते दीड वर्षापासून पंढरपुरात कर्तव्यावर आहेत. पोलिस सेवेत येण्यापूर्वी डॉ. कवडे यांनी बीएएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. त्या दरम्यान त्यांनी वैद्यकीय सेवा केली. त्यानंतर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात ते यशस्वी झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी गडचिरोली भागात तीन वर्षे काम केले. अलीकडेच त्यांना नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या उल्लेखनीय कामाबाबत पोलिस महासंचालक पदक व विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले. त्यानंतर मागील आठवड्यात केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. सध्या कोरोना पार्श्‍वभूमीवर आपल्याकडील वैद्यकीय ज्ञानाचा समाजासाठी फायदा व्हावा, यासाठी त्यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. 
पंढरपूरच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी बीएएमएसची वैद्यक शास्त्रातील पदवी घेतली आहे. त्यांनी तहसीलदार होण्यापूर्वी रुग्णांची सेवा केली आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच प्रशसाकीय सेवेत काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन करून तहसीलदार म्हणून रुजा झाल्या. प्रशासकीय कामबरोबरच आपल्याकडे असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा गोरगरीब रुग्णांना फायदा व्हावा, शासकीय डॉक्‍टरांवर आलेला ताण कमी व्हावा याच सामाजिक भावनेपोटी त्यांनी सोमवारपासून पंढरपूर येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात एक तास रुग्ण सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrative officers with doctors in charge of patient care