करमाळ्यात 159 मतदान केंद्रांसाठी 795 अधिकारी-कर्मचारी ! 14 गावे संवेदनशील म्हणून घोषित

अण्णा काळे 
Thursday, 14 January 2021

या निवडणुकीकरिता एक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह दोन पोलिस निरीक्षक, पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक व 125 पोलिस अंमलदार, एक राज्य राखीव दलाची 25 कर्मचाऱ्यांची तुकडी आणि 96 होमगार्ड असा बंदोबस्त नेमलेला आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा तैनात करण्यात आली असून, 159 मतदान केंद्रांसाठी 795 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली. निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून 14 गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 

एकूण 391 जागांसाठी 860 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. करमाळा तालुक्‍यातील एकूण 51 ग्रामपंचायतींपैकी सालसे आणि जेऊरवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. उर्वरित 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुका व पोटनिवडणूकसह एकूण 56 गावांमध्ये निवडणूक होणार असून, 159 बूथ आणि 67 इमारतीत पार पडणार आहे. 

या निवडणुकीकरिता एक उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह दोन पोलिस निरीक्षक, पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक व 125 पोलिस अंमलदार, एक राज्य राखीव दलाची 25 कर्मचाऱ्यांची तुकडी आणि 96 होमगार्ड असा बंदोबस्त नेमलेला आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, याकरिता करमाळा पोलिसांकडून विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली. 

संवेदनशील म्हणून 14 गावे घोषित 
देवळाली, पोथरे, मांगी, निमगाव ह, साडे, बोरगाव, नेरले, पिंपळवाडी, सावडी, उमरड, श्रीदेवीचा माळ, हिसरे, हिवरवाडी, जातेगाव आदी गावांचा संवेदनशी गावांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

107 कलमाप्रमाणे एकूण 276 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. कलम 110 प्रमाणे एकूण 23 कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये तहसील कार्यालयाकडून 3 बॉंड आणि स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर यांच्याकडील 13 बॉंड असे एकूण 16 बॉंड घेतलेले आहेत. कलम 144 प्रमाणे एकूण 95 जणांवर मतदानाच्या दिवशी तडिपार करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येऊन तडिपार होण्याबाबत 95 नोटिसा काढण्यात आल्या आहेत. कलम 149 प्रमाणे करमाळा पोलिस ठाण्यास यापूर्वी विविध कारणांवरून दाखल गुन्ह्यातील एकूण 257 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 
- श्रीकांत पाडुळे, 
पोलिस निरीक्षक, करमाळा 

मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित उमेदवार, मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेत कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नाही. 
- समीर माने, 
तहसीलदार, करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrative preparations for Gram Panchayat elections in Karmala taluka have been completed