श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट

अभय जोशी
शनिवार, 23 मे 2020

दशहरा सुरू होत असल्याने पहिल्या दिवसाच्या निमित्त शनिवारी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये विठुमाऊली उभी आहे, असा भास होत आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील कृष्णात लक्ष्मण देशमुख यांनी मंदिर समितीला या आकर्षक सजावटीसाठी द्राक्षे दिली असून मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी ही सजावट केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : दशहरा सुरू होत असल्याने पहिल्या दिवसाच्या निमित्त शनिवारी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये विठुमाऊली उभी आहे, असा भास होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील कृष्णात लक्ष्मण देशमुख यांनी मंदिर समितीला या आकर्षक सजावटीसाठी द्राक्षे दिली असून मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी ही सजावट केली आहे.
येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्षभरात विविध सण आणि उत्सवांच्या दिवशी फळाफुलांनी आकर्षक सजावट केली जाते. त्याच पद्धतीने आज दशहराच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर समितीकडून अलीकडेच श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोषाखामध्ये उत्तम रंगसंगतीचा वापर केला जाऊ लागला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे राजस सुकुमाराचे रूप आणखी खुलून दिसावे यासाठी सजावटीच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबवत आहेत. पोशाखाच्या रंग संगती मध्ये विविधता आणली जात आहे. उठून दिसेल अशा पद्धतीच्या आकर्षक रंगसंगतीमुळे विठुरायाचे लोभसवाणे रूप अधिक खुलून दिसण्यास मदत होऊ लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले असले तरी मंदिरातील नित्योपचार नेहमीप्रमाणे सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adorable decoration with the help of grape vines in the temple of Sri Vitthal Rukmini