ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, कोरोना आहे यावर माझा विश्‍वास नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक !

श्रीनिवास दुध्याल 
Tuesday, 1 September 2020

देशात आणि महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. कोरोनामुळे देशात हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा केला आहे. 

सोलापूर : सरकारला कोरोनाविषयी काहीही कल्पना नाही, असं मला वाटतं. दुकानं सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलने करावी लागत आहेत. आज मंदिरे उघडा यासाठी आंदोलन केले. हे शासन कोरोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे. कोरोना आहे, यावर माझा विश्वास नाही, अशी ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ऍड. आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. देशात आणि महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. कोरोनामुळे देशात हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असा दावा केला आहे. 

ऍड. आंबेडकर यांनी धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोना आणि परिस्थितीवर भूमिका मांडली. धार्मिक स्थळे खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? गर्दी होऊ नये असे प्रयत्न केले जात असताना अशी मागणी का केली जात आहे, असा प्रश्न ऍड. आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. 

महाराष्ट्रात दररोज दोनशे ते अडीचशे लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होत असताना तुम्हाला असे का वाटते की सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे? कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही, या प्रश्नावर भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू एकेदिवशी होणारच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोन-अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात, पण निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेन. कोरोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत, असे सांगत आंबेडकर म्हणाले, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आहे का, की कोरोनामुळे मृत्यू झाला आहे? माझा यावर अजिबात विश्वास नाही. कारण मी माणसं जगताना बघतोय, असं आंबेडकर यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adv. Prakash Ambedkar says, I dont believe that corona causes death