
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ऍडव्हेंचर पार्क, हुतात्मा बाग, स्ट्रीट बझार, रंगभवन प्लाझा, होम मैदानावरील वॉकिंग ट्रॅक अशी कामे करण्यात आली आहेत. दोन वर्षांनंतरही ही कामे महापालिकेने ताब्यात न घेतल्याने आता त्या ठिकाणी पुन्हा दुरुस्ती करावी लागणार आहे.
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ऍडव्हेंचर पार्क, हुतात्मा बाग, स्ट्रीट बझार, रंगभवन प्लाझा, होम मैदानावरील वॉकिंग ट्रॅक अशी कामे करण्यात आली आहेत. दोन वर्षांनंतरही ही कामे महापालिकेने ताब्यात न घेतल्याने आता त्या ठिकाणी पुन्हा दुरुस्ती करावी लागणार आहे. साधारणपणे फेब्रुवारीत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून स्ट्रीट बझार, ऍडव्हेंचर पार्क सुरू केले जाणार आहे.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीने स्मार्ट सिटीतून झालेल्या कामांची शुक्रवारी पाहणी केली. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, सभागृहनेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, नगरअभियंता संदीप कारंजे, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, भूमी व मालमत्ता विभागाच्या अधीक्षक सारिका आकुलवार आदी उपस्थित होते.
या वेळी स्मार्ट सिटीतून झालेल्या हुतात्मा बाग, ऍडव्हेंचर पार्क, होम मैदानाजवळील स्ट्रीट बझार, रंगभवन प्लाझा, होम मैदानावरील वॉकिंग ट्रॅक या कामांची पाहणी केली. कामे पूर्ण झाली, परंतु आणखी दुरुस्ती करणे आवश्यक असून दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ही सर्व कामे महापालिकेकडे हस्तांतरण करून घेण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. आता या समितीची आज (शनिवारी) अथवा सोमवारी (ता. 25) बैठक होणार असून त्यानंतर हस्तांतर आणि या कामांचे लोकार्पण याची तारीख निश्चित होईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
समितीच्या सूचनेनुसार होईल दुरुस्ती
शहरातील विविध कामे स्मार्ट सिटी योजनेतून दोन वर्षांपूर्वी झाली आहेत. मात्र, महापालिकेने सर्व कामे पूर्ण होऊनही वेळेत हस्तांतर केलेली नाहीत. आता महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्मार्ट सिटीतून झालेल्या कामांची पाहणी केली आहे. त्यांनी सुचविलेल्या कामांची दुरुस्ती करून सर्व कामे महापालिकेकडे हस्तांतर केली जातील, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे- पाटील यांनी दिली. हस्तांतर झाल्यानंतर त्या ठिकाणांची देखभाल- दुरुस्ती महापालिकेतर्फे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल