आठ महिन्यांनंतर जिल्ह्यातील न्यायालये दोन सत्रात सुरू ! मुंबई उच्च न्यायालयाची नियमावली जारी 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 2 December 2020

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील न्यायालये मंगळवारपासून दोन सत्रात सुरू करण्यात आली. गेल्या आठ महिन्यांपासून न्यायालय पूर्ण वेळेत सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या वकील व पक्षकारांना 1 डिसेंबरपासून न्यायालये दोन सत्रात सुरू झाल्याने आनंद झाला. 

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील न्यायालये मंगळवारपासून दोन सत्रात सुरू करण्यात आली. गेल्या आठ महिन्यांपासून न्यायालय पूर्ण वेळेत सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या वकील व पक्षकारांना 1 डिसेंबरपासून न्यायालये दोन सत्रात सुरू झाल्याने आनंद झाला. 

गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनामुळे न्यायालयातील कामकाज ठप्प असल्यामुळे न्यायालयात प्रॅक्‍टिस करणाऱ्या वकिलांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व न्यायालयांतील कामकाजाला 23 मार्चपासून खीळ बसली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील न्यायालयातील कामकाज एकाच सत्रात सुरू होते अन्‌ फक्‍त महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी सुरू होती. 

मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 1 डिसेंबरपासून राज्यातील न्यायालयातील कामकाज दोन सत्रात सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक न्यायिक सत्र हे अडीच तासाचे असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी दीड आणि दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार या वेळेत कामकाज सुरू होणार आहे. तसेच न्यायालयात न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांची 100 टक्‍के उपस्थिती असणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने दिली नियमावली 

  • पहिल्या सत्रात पुरावा घेणे व इतर महत्त्वपूर्ण कामे होणार असून, दुपारी युक्‍तिवाद, निकाल व आदेश आदी काम होतील 
  • वकील, पक्षकार, वादी, प्रतिवादी, अर्जदार, आरोपी किंवा इतर कोणाच्याही गैरहजेरीत कोणताही नुकसान करणारा आदेश सहसा न्यायालय करणार नाही 
  • बार रूम तसेच लायब्ररी सुरू करता येणार आहे 
  • न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर न्यायकक्ष सोडणे आवश्‍यक राहणार 
  • नाक व तोंड झाकले जाईल असे मास्क वापरणे व सुरक्षित अंतर राखणेही बंधनकारक राहणार आहे 
  • आवश्‍यक ते निर्णय घेण्याचे अधिकार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना राहणार आहेत 

सर्व वकील बंधू-भगिनींच्या प्रयत्नातून तसेच मागणीतून आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर न्यायालयीन कामकाज सुरू होत आहे. न्यायालयातील दिवाणी व फौजदारी कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील सर्व न्यायलये सुरू झालेली आहेत. त्यामुळे वकिलांची जबाबदारी वाढली आहे. वकिलांनी आपण स्वत:, आपले अशील व सर्व संबंधित हे न्यायालयीन आदेशांचे पालन करतील व याची खबरदारी घेतील. 
- ऍड. हेमंतकुमार साका, 
खजिनदार, सोलापूर बार असोसिएशन 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After eight months the district courts begin in two sessions