महापूरानंतरही भोगावतीकाठची शेती तहानलेलीच 

रमेश दास 
Monday, 30 November 2020

पाटबंधारे उपविभाग बार्शीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, देगाव (वा.) येथील भोगावती नदीवरील बंधाऱ्याची महापुरात वाहून गेलेल्या भिंतीच्या बाजूकडे मुरुम व मातीचा बांध घालून वाहून जाणारे पाणी तत्काळ अडविण्यात आले आहे. चार गेट टाकून दोन मीटर पर्यंत पाणीसाठा झाला आहे. 

वाळूज (ता. मोहोळ जिल्हा सोलापूर) : मोहोळ तालुक्‍याच्या उत्तर भागातील भोगावती नदीकाठच्या वाळुज, देगावसह भैरववाडी, मनगोळी, मुंगशी, डिकसळ गावासाठी ओला दुष्काळ संपतो ना संपतो तोच कोरड्या दुष्काळाची चाहूल लागली आहे. कारण देगाव (ता.मोहोळ) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या 2016 मध्ये आलेल्या पूरामुळे वाहून गेलेल्या भरावाच्या दुरुस्तीचे काम 90 लाख रुपये खर्चूनही निकृष्ट झाल्याने आणि भरावाला दगडी पिचींगन केल्याने येथील भराव यावर्षीही भोगावती नदीला आलेल्या महापूरात पुन्हा त्याच ठिकाणी वाहून गेला आहे. त्यामुळे महापूरानंतरही भोगावतीकाठची शेती तहानलेलीच आहे. 

याबाबत माहिती देताना पाटबंधारे उपविभाग बार्शीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी सांगीतले की, "बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाने तातडीने आठ लाख रुपये खर्चून देगाव येथील बंधाऱ्याच्या वाहून गेलेल्या बाजूकडे मुरुम आणि मातीचा बांध घालून वाहून जाणारे पाणी अडविले आहे. बासष्ठ गाळे असलेल्या या बंधाऱ्याला चार गेट टाकून दोन मीटर पर्यंत पाणी अडवून 34.24 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. डिकसळ येथील बंधाऱ्याला सहा गेट टाकून तीन मीटर पर्यंत 37.34, तर भोयरे येथील बंधाऱ्याला नऊ दारे टाकून सहा मीटर पर्यंत 51.40 दशलक्ष घनफूट पाणी अडविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

नदीतून पाण्याला प्रवाह अजून वाहत आहे. तो आटला तर जेमतेम फेब्रुवारीपर्यंत हे पाणी पुरेल. त्यानंतर मात्र, नदीकाठच्या शेतीला आणि गावांना पिण्याच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. भोगावती व नागझरी या नद्यांकाठच्या पिकांचे व शेतीचे अतिवृष्टी आणि महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचा पेरा उशीरा झाला आहे. नवीन पिके घेण्यासाठी नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासणार आहे. अन्यथा यावर्षी प्रथम कोरोनामुळे आणि नंतर महापूरामध्ये पिके आणि शेती वाहून गेल्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे. 

पाटबंधारे उपविभाग बार्शीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, देगाव (वा.) येथील भोगावती नदीवरील बंधाऱ्याची महापूरात वाहून गेलेल्या भिंतीच्या बाजूकडे मुरुम व मातीचा बांध घालून वाहून जाणारे पाणी तत्काळ अडविण्यात आले आहे. चार गेट टाकून दोन मीटर पर्यंत पाणीसाठा झाला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the floods, Bhogawati wood farming is thirsty