बैठक घ्यायची की नाही?, जाऊ का निघून मी, सतेज पाटलांच्या इशाऱ्यानंतर सुशीलकुमार शिंदेंचे समर्थक झाले शांत 

प्रमोद बोडके
Sunday, 22 November 2020

उदय सामंत म्हणाले सुशीलकुमार शिंदे आमच्या हृदयात 
सुशीलकुमार शिंदे ज्या वेळी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नसल्याची भूमिका कै. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी घेतल्याची आठवणही शिवसेनामंत्री सामंत यांनी त्यांच्या भाषणात सांगितली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या हृदयात सुशीलकुमार शिंदे असल्याचेही सामंत यांनी त्यांच्या भाषणात सांगून कार्यकर्त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. 

सोलापूर : महाविकास आघाडीच्या फलकावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो लावला नाही म्हणून राष्ट्रवादीने माफी मागितली आहे. मी देखील तुमची माफी मागतो असे म्हणत हा विषय आता इथेच थांबवा असे आवाहन कॉंग्रेसचे राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले. तरी देखील कार्यकर्ते ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने शेवटी राज्यमंत्री पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत घ्यायची नाही का बैठक?, जाऊ मी निघून असाच इशारा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक शांत झाले.

गोंधळात सुरु झालेली सोलापुरातील महाविकास आघाडीची बैठक अखेर पार पडली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर तिन्ही पक्षांची एकत्रित होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. त्यामुळे आपल्याला ही परीक्षा पास करायची आहे हे सांगून कॉंग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी नाराज कॉंग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा सल्ला दिला. 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी आज सोलापुरातील हेरिटेज लॉन्समध्ये महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा झाला. मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे छायाचित्र नसल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु झाली.

नंतर या कुजबुजीचे रुपांतर गोंधळात सुरु झाले. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले राष्ट्रवादीचे जयंत पाटील व दत्तात्रेय भरणे, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, कॉंग्रेसचे मंत्री सतेज पाटील हे चारही मंत्री बैठकीच्या ठिकाणच्या गोंधळ पहातच बसले. राष्ट्रवादीच्या आणि कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हा गोंधळ आवरत नसल्याचे लक्षात येताच राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी दिलेल्या खणखणीत इशाऱ्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक शांत झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the hint of Satej Patil, Sushilkumar Shinde's supporters became calm