नोकरी व सेवानिवृत्तीनंतर शिक्षण क्षेत्रात शेवटच्या श्वासापर्यंत लढलेला लढवय्या : बी. टी. पाटील 

B T Patil
B T Patil

स्मरण : महाराष्ट्रात संतनगरी व ज्वारीचे कोठार म्हणून ओळख निर्माण केलेला मंगळवेढा तालुका. या तालुक्‍यात शिक्षणाचा अभाव असताना देखील शिक्षणातून फौजदार होण्याचे स्वप्न बाळगले. मात्र त्यापासून बाजूला होऊन शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करताना मंगळवेढ्याच्या शाळेतील विद्यार्थी परदेशात जाऊन आपल्या तालुक्‍याचा नावलौकिक वाढवावा, यासाठी झटणाऱ्या बाजीराव तुकाराम पाटील ऊर्फ बी. टी. पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ते नोकरी आणि सेवानिवृत्तीनंतर शिक्षणासारख्या क्षेत्रात शेवटच्या श्वासापर्यंत लढलेला लढवय्या ठरले. पण कोरोना संकट आल्याने त्यांचा देहदानाचा संकल्प मात्र अपूर्ण राहिला. 

स्व. रतनचंद शहा, स्व. कदम गुरुजी, स्व. जेट्याप्पा परीट, स्व. चंद्राम गुरुजी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, स्व. वसंतराव जाधव, स्व. ह. ना. कवचाळे यांच्या बरोबरीने तालुक्‍यातील शैक्षणिक विकासात बी. टी. पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील भालेवाडी गावातील सर्वसामान्य मध्यम कुटुंबात जन्मलेले बी. टी. पाटील यांचा शैक्षणिक प्रवास तसा खडतरच. घरातील अशिक्षित कुटुंबातून वडिलांची इच्छा होती, की मुलाने शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हावे, मुलगा पोलिस खात्यात नोकरी लागावा, अशी अपेक्षा केली. पण त्यांना शिक्षण खात्यात नोकरी करण्याची संधी मिळाली. या नोकरीतूनच बी. टी. पाटील यांनी मंगळवेढा येथील दलित मित्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या स्थापनेमध्ये सहभागी झाले. स्व. कदम गुरुजींच्या सोबतीने संस्थेचे कामकाज पाहिले. त्यातून इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत सुरवातीच्या शिक्षक पदापासून ते 35 वर्षे मुख्याध्यापकपद समर्थपणे सांभाळले. स्व. कदम गुरुजींचा विश्वास सार्थकी लावण्यात मोठे योगदान दिले. 

या कालावधीत महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मंगळवेढ्याच्या ज्वारीला चांगला दर आणि दर्जा आहे, तोच गौरव मंगळवेढ्याच्या मातीत जन्मलेल्या मुलाला व मुलीला शैक्षणिक क्षेत्रातून मिळावा, या उद्देशाने त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मंगळवेढ्यातील अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग, वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रात चमकले. तालुक्‍याचा शैक्षणिक दर्जा सर्वोत्तम राहिला. तालुक्‍यामध्ये असलेल्या इतर शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांपेक्षा मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचा दबदबा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात कायम ठेवण्यात त्यांनी योगदान दिले. फक्त शिक्षणच नाही तर क्रीडा क्षेत्रात दबदबा ठेवण्यासाठी इतर शिक्षकांना प्रोत्साहित केले. त्यामध्ये विशेषत: धावपटू भाग्यश्री बिलेला पाठबळ देऊन तिला परदेशात पाठवण्यासाठी सहकार्य केल्याने दुष्काळी तालुक्‍याचे नाव परदेशात कोरले गेले. 

त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना स्व. कदम गुरुजींच्या संस्थेचे वटवृक्ष वाढवण्यासाठी योगदान दिले. स्व. कदम गुरुजी, डॉ. सुभाष कदम, मीनाताई कदम, ऍड. सुजित कदम यांच्या सोबतीने संस्थेतील शाळेच्या गुणवत्तेवर भर दिला. दहावी व बारावी निकालात तालुक्‍यात पहिला येण्याचा मान शाळेतील विद्यार्थ्याला मिळावा म्हणून विद्यार्थी व शिक्षकांना झटण्यासाठी मार्गदर्शन करणारा व शिस्तीचा मुख्याध्यापक म्हणून त्यांची ओळख राहिली. त्यामुळे तालुक्‍याच्या शैक्षणिक संस्थेचा आलेख विचारात घेता मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणात्मक दर्जा वाढविण्यावर त्यांनी योगदान दिले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी प्रबोधनाचे काम देखील चांगल्या पद्धतीने केले. तालुक्‍यातील मागासलेल्या व दुर्लक्षित घटकांना त्यांनी त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून ज्येष्ठ नागरिक संघ स्थापनेमध्ये त्यांनी योगदान दिले, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना समाजात सन्मान मिळाला, तसेच त्यांच्यात असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. 

अंधश्रद्धेला त्यांनी उभ्या आयुष्यात खतपाणी घातले नाही. भालेवाडीत लग्न झाल्यानंतर शिंगणापूरला जाऊन नवरा-बायकोचे मुंडन (खवर) करण्याची प्रथा त्यांनी सर्वप्रथम मोडून काढली. शिक्षण प्रसारक मंडळावर अनेक वर्षे सचिव व उपाध्यक्षपदावर त्यांनी उल्लेखनीय काम केले. आपल्या मृत्यूनंतर देहदान करण्याचा त्यांनी संकल्प केला होता; पण कोरोना असल्या कारणाने सर्वच मेडिकल कॉलेज बंद असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या विचाराला साजेल असे मृत्यूपश्‍चात विधी केले. त्यांच्या अस्थी नदीमध्ये टाकून प्रदूषित करण्यापेक्षा संस्थेच्या सर्व प्रशालांमध्ये खड्डा घेऊन तिथे अस्थी विसर्जित करून बकुळाचे झाड लावण्यात आले. तिसऱ्या दिवशीच्या विधीतील अंधश्रद्धेला मूठमाती दिली. खऱ्या अर्थाने ते मंगळवेढ्यातील शिक्षण क्षेत्रात अविरत खळाळणारे प्रेरणास्रोत होते, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com