विळखा बर्ड फ्लूचा ! मंगळवेढ्यातील जंगलगीनंतर आता गणेशवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू; रिपोर्ट पॉझिटिव्ह 

हुकूम मुलाणी 
Tuesday, 26 January 2021

तालुक्‍यातील चोखामेळा नगर येथील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर गणेशवाडी येथील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर भालेवाडी व मारापूर येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप आलेला नाही. 

मंगळवेढा (सोलापूर) : बर्ड फ्लू आजाराचा विळखा तालुक्‍यामध्ये घट्ट होत असून, सध्या या रोगामुळे गणेशवाडी येथे दहा कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील 1427 कोंबड्या नष्ट करण्यात येणार असून, चोखामेळा नगरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या भागातील कुक्कुट पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यामध्ये बर्ड फ्लूसदृश आजाराची लागण जंगलगी येथील पोल्ट्री फार्मवरील पक्ष्यांवर झाला. या पोल्ट्रीतील पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ऍलर्ट झोन जाहीर केला. या गावातील 773 कोंबड्या व 110 अंडी नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर भालेवाडी व मारापूर येथे देखील बर्ड फ्लूसदृश आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली. कोंबडी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले असताना पुन्हा चोखामेळा नगर येथे देखील कोंबड्यांचा मृत्यू झाला. नंतर त्याचा विळखा गणेशवाडीत पसरला. दरम्यान, चोखामेळा नगर येथील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर गणेशवाडी येथील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर भालेवाडी व मारापूर येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल अद्याप आलेला नाही. 

सध्या जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय निवडला आहे. परंतु, कोंबड्यांच्या मृत होण्याच्या घटनेमुळे या कुक्कुट पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कोंबड्या नष्ट करण्यापेक्षा विकलेल्या बऱ्या, अशी भावना अनेकांची झाली. त्यामुळे 400 रुपये कोंबड्या 50 रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे. शासनाकडून प्रती कोंबडी 90 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. 

चोखामेळा नगरचा अहवाल निगेटिव्ह आला. भालेवाडी व मारापूरचा अहवाल यायचा आहे. तर गणेशवाडी येथील अहवाल पॉझिटिव्ह असून ऍलर्ट झोनबाबत आदेश लवकर होईल. त्यानंतर या भागातील जवळपास 1427 कोंबड्यांना नष्ट केल्या जाणार आहेत. 
- गोविंद राठोड, 
पशुधन अधिकारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Jangalgi in Mangalwedha taluka Hens died of bird flu in Ganeshwadi