esakal | 'किसान रेल'नंतर आता सांगोल्यातून रो-रो रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

After Kisan Railway Ro Ro Railway will now start from Sangola

रो-रो रेल्वे रॅकमध्ये मालाने भरलेली ट्रक थेट उभी करता येणार असल्याने याचा सर्वात मोठा फायदा मिळणार आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी बैठकीत दिली. 

'किसान रेल'नंतर आता सांगोल्यातून रो-रो रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : लॉकडाउनमुळे हतबल झालेल्या बळीराजासाठी रेल्वे मंत्रालयाने सांगोल्यातून किसान रेल सुरू केली. सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल तथा अन्य मालाची वाहतूक करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून लवकरच रोल ऑन-रोल ऑफ (रो-रो) रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांचं रो-रो रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. 
सांगोल्यातून किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी मध्य रेल्वेचे अधिकारी, किसान संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व व्यापारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सांगोला ते दानापूर (पाटणा) या किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. किसान रेल्वे देशाच्या प्रमुख बाजारपेठेत कशी जाईल यासंदर्भात चर्चा झाली. पुरेसा शेतीमाल मिळाल्यास किसान रेल्वेची सेवा कोलकाता व दिल्लीपर्यंत वाढवण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले. 
या बैठकीत किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध पुजारी यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी मांडल्या. किसान रेल्वेचा जास्त फायदा सामान्य शेतकरी व किरकोळ व्यापाऱ्यांना मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाने अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी केली. शेतकऱ्यांचा शेतीमाल दानापूर बाजारपेठेपर्यंत पोहच करण्यासाठी किसान रेल्वे सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्ली, चेन्नई, केरळ, गुवाहाटी, कोलकातासह अन्य बाजारपेठेत शेतीमाल पाठवण्यासाठी रो-रो रेल्वे सुरू करण्याची मागणी अनिरुद्ध पुजारी यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली. 
बैठकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, सांगोला तालुक्‍यासह आसपासच्या तालुक्‍यात डाळिंब, सिमला मिरची, द्राक्षे, बोर, पेरू, सीताफळ, केळी, कलिंगड, खरबूज, शेवगा यासह अन्य फळे व भाजीपाला स्थानकात लोडिंग करण्यासाठी वेळ लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी बैठकीत रोल ऑन-रोल ऑफ (रो-रो) रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. रो-रो रेल्वे रॅकमध्ये मालाने भरलेली ट्रक थेट उभी करता येणार असल्याने याचा सर्वात मोठा फायदा मिळणार आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी बैठकीत दिली. 
या बैठकीला पंढरपूर रेल्वे विभागाचे वाणिज्य निरीक्षक श्रीवास्तव, मुख्य माल पर्यवेक्षक एस. एम. मुळे, रेल्वेचे कनिष्ठ अभियंता प्रसाद जोशी, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध पुजारी, डाळिंब असोसिएशनचे अध्यक्ष अनिल केदार-सावंत, किसान संघाचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण येलपले, शशिकांत येलपले, अनिल विभूते, नितीन पाटील, किसान सभेचे तालुका सचिव सुदीप बेले, पाणी चळवळीचे डॉ. विजय बाबर आदी उपस्थित होते. 

संपादन : वैभव गाढवे