दिवाळीनिमित्त अकलूजची बाजारपेठ येत आहे पूर्वपदावर; मात्र मार्केट 50 टक्के डाउन ! 

Mohol Market
Mohol Market
Updated on

अकलूज (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील बंदमुळे ठप्प झालेली अकलूजची बाजारपेठ दिवाळीच्या सणामुळे पुन्हा पूर्वपदावर येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉउनमुळे किराणा व दूध व्यावसायिक सोडून इतर सर्व किरकोळ व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनलॉकनंतर जरी सर्व व्यवहार सुरू झाले असले तरी ग्राहकांची वानवाच होती. गत महिन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील ग्राहकांनी बाजारपेठेत येणे टाळल्यामुळे लॉकडाउन काळात ज्या किराणा व्यापाऱ्यांना चांगला व्यवसाय मिळाला त्यांनाही फटका बसला. 

अकलूज परिसरात तीन साखर कारखाने असून या तीनही साखर कारखान्यांमुळे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी व मजूर यांच्याकडे थोडाफार पैसा आला. परंतु आधीच कोरोनामुळे शेतमाल शेतातच सोडावा लागला व ग्राहकाअभावी नुकसानीस सामोरे जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुराने देशोधडीला लावले. शेतकऱ्यांसारखीच नोकरदारांची अवस्था असून नोकरदारांना संपूर्ण पगारच मिळाला नाही, तर दिवाळी बोनस मिळणेही दुरापास्तच. त्यातूनही काही आस्थापनांनी थोडा बोनस दिला आहे. त्यामुळे हाती असलेल्या तुटपुंज्या रकमेत दिवाळी कशी साजरी करायची, हा यक्ष प्रश्न प्रत्येकासमोर उभा राहिला. 

हा सर्व वर्ग कोरोनानंतर प्रथमच दिवाळीच्या खरेदीसाठी अकलूज बाजारपेठेत दाखल झाला. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी दिसत असली तरी, ग्राहकांनी किराणा माल खरेदीला प्राधान्य दिले असले तरी त्यातही काटकसर करीत गतवर्षीच्या तुलनेने 40 ते 50 टक्के खरेदी कमी केली. कापड दुकानातही फार मोठी उलाढाल झाली नाही. ग्राहकांनी फक्त गरजेपुरतेच व लहान मुलांसाठीच्या कपडे खरेदीस प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले. 

इलेक्‍ट्रॉनिक व फ्रिज, टिव्ही आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली; तर सोन्या - चांदीच्या दुकानांत फक्त छोट्या - छोट्या व गरजेच्याच दागिन्यांची खरेदी झाली. फटाक्‍यांच्या खरेदीलाही लगाम लावला गेला. गतवर्षीच्या तुलनेने फक्त 30 ते 40 टक्केच फटाक्‍यांची विक्री होईल व राहिलेला माल वर्षभर सांभाळावा लागणार असल्याचे फटाका व्यापाऱ्यांनी सांगितले. 

तरीही कोरोना, अतिवृष्टी व महापूर यामुळे देशोधडीला गेलेला ग्राहक बाजारपेठेत तरी आला असल्याने बाजारपेठेत गर्दी जाणवू लागली आहे. त्यामुळे व्यापारात सुधारणा होईल व लवकरच मार्केट पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यापारी वर्ग करीत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com