"धडधड' अजून मंदच ! साडेचार कोटींची उलाढाल आली अडीच कोटींवर; अनेक "टेक्‍स्टाईल' बंदच

श्रीनिवास दुध्याल 
Tuesday, 15 September 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांबरोबरच येथील टेक्‍स्टाईल उद्योगही भरडला गेला. मात्र लॉकडाउन शिथिलीकरणात 5 जूनपासून टेक्‍स्टाईल उद्योग पुन्हा सुरू झाला, मात्र तीन महिने होऊन गेले तरी हा उद्योग पूर्वपदावर आलेला नाही. 

सोलापूर : लॉकडाउननंतर सुरू झालेला यंत्रमाग उद्योग तीन महिन्यांनंतरही रुळावर आला नाही. अवघी 60 टक्के उत्पादने सुरू असून, छोट्या उद्योजकांनी कारखाने बंद ठेवले आहेत. रोजची साडेचार कोटींची उलाढाल आता अडीच कोटींवर आली आहे. दसरा-दिवाळीपासून व्यापारपेठा सुरळीत सुरू होतील या आशेवर मोठे उत्पादक टेरी टॉवेलची उत्पादने घेत आहेत, तीही वेळा कमी करून. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांबरोबरच येथील टेक्‍स्टाईल उद्योगही भरडला गेला. मात्र लॉकडाउन शिथिलीकरणात 5 जूनपासून टेक्‍स्टाईल उद्योग पुन्हा सुरू झाला, तरी तीन महिने होऊन गेले, हा उद्योग पूर्वपदावर आलेला नाही. कारण, लॉकडाउन शिथिलीकरणानंतर हळूहळू बाजारपेठा सुरू झाल्या; तरी टॉवेल, चादरींना मागणी नाही. महत्त्वाची लग्नसराई गेली, पर्यटन बंद आहे, कार्यक्रम नाहीत त्यामुळे आहेर, गिफ्ट वगैरेही दिले-घेतले जात नाहीत. सध्या अत्यावश्‍यक वस्तूंची खरेदी सुरू असल्याने चादर, टॉवेलना दुय्यम स्थान आहे. अधिक मासानिमित्त दसरा-दिवाळी सणही लांबणीवर गेल्यानेही मागणीवर परिणाम झाला आहे. तरीही दसरा-दिवाळी व त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईला नजरेसमोर ठेवून उत्पादने घेतली जात आहेत. 

20 ते 25 कारखाने बंद
सध्या विक्री कमी आहे तरी भविष्यात मागणी येईल या दृष्टीने मोठे कारखानदार उत्पादने करून स्टॉक ठेवत आहेत. मंदीमुळे लहान उत्पादक व मजुरी बेसवर भाडे तत्त्वाने यंत्रमाग चालवणाऱ्या उत्पादकांनी उत्पादने बंद ठेवल्याने मूळ यंत्रमाग मालकांनी कारखाने बंद ठेवले आहेत. असे जवळपास 20 ते 25 कारखाने बंद आहेत. त्यामुळे साडेचार कोटींची उलाढाल अडीच कोटींवर आली आहे. 

बाजारपेठा सुरू झाल्यानंतरही मागणी मंदावली
सोलापुरी चादर व टेरी टॉवेलला देशांतर्गत बाजारपेठांमध्येही मागणी असते. साउथ आफ्रिका, आखाती राष्ट्र, लंडन, जर्मन व श्रीलंका आदी राष्ट्रांमध्ये येथील उत्पादने निर्यात होतात. मात्र देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठा सुरू झाल्यानंतरही मागणी मंदावली आहे. 

उद्योग सुरळीत होण्यास वेळ लागेल
याबाबत सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणाले, लॉकडाउननंतर टेक्‍स्टाईल उद्योग सुरू झाला, मात्र अपेक्षित मागणी नसल्यामुळे जवळपास 60 टक्केच उत्पादने घेतली जात आहेत. महत्त्वाचे सीझन हातून निसटले आहेत. आता दसरा-दिवाळी व लग्नसराई दृष्टिक्षेपात असून, त्यासाठी सध्या उत्पादने घेतली जात असून, त्याचा स्टॉक करून ठेवला जात आहे. त्यामुळे हा उद्योग सुरळीत होण्यास वेळ लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After lockdown Products in the textile industry are still not in demand