मंगळवेढ्यातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर पोटनिवडणुकीसाठीचे तिन्ही गटाचे दावेदार सुखावले ! 

Bhalke_Paricharak_awtade
Bhalke_Paricharak_awtade

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सदस्यांबाबत दावे - प्रतिदावे होत असताना, सर्वच राजकीय नेत्यांकडून आपला गटच सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी मरवडे आणि बोराळे येथे सत्ताधारी भालके गटाचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा असला, तरी नंदेश्वरमध्ये दादा गरंडे यांनी मिळवलेला विजय हा परिचारक गटाला दिलासा देणारा ठरला आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतींच्या 186 जागांसाठी सोमवारी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट झाल्यानंतर सर्वच राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी आपल्याच गटाकडे जास्त ग्रामपंचायती असल्याचा दावा केला. आगामी दामाजी कारखाना व विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता, ही निवडणूक सर्वच गटांनी प्रतिष्ठेची केली. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पश्‍चात कार्यकर्त्यांनीच निवडणूक हाताळली. 

आमदार प्रशांत परिचारकांनी मंगळवेढ्यापेक्षा पंढरपूरमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे परिचारक गटाला मंगळवेढ्यात अपेक्षित सदस्यसंख्या गाठता आली नाही. किबुहना समर्थकांनी लक्ष दिले नाही. आवताडे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा फायदा झाला. त्यामुळे आवताडे आणि भालके गटाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाजी मारण्याचा प्रयत्न केला. तर काही गावात एकाच गटातील एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या गटांनी विरोधी गटाचा हातभार घेऊन गट संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सिद्धापूर येथे परिचारक गटाने भालके गटाचा आश्रय घेत भालके गट व आवताडे गटाचा पराभव केला. अगदी तशीच परिस्थिती बोराळे, डोणज, सलगर, नंदेश्वर, महमदाबाद शे, हुलजंती आदी गावांत दिसून आली. 

14 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाल्यामुळे ग्रामपंचायती मालामाल झाल्या. त्यामध्ये या कामातून आर्थिक लाभ होत चालल्यामुळे इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायतच बरी, म्हणत अनेक नेत्यांनी लक्ष घातले. या निवडणुकीत सिद्धापूर, माचणूर, हुलजंती या गावांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्यामुळे ग्रामपंचायतीवर सत्ता महत्त्वाची वाटू लागली. सत्तेसाठी कोणत्याही विरोधी गटाशी तडजोड करत सत्ता मिळवण्याचा चंग बांधलेले नेते या ठिकाणी यशस्वी ठरले. 

काही गावांत तरुणांनी पुढाकार घेत ज्येष्ठांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला, याशिवाय भोसे ग्रामपंचायतमध्ये 15 मधील 10 जागा बिनविरोध निघाल्या होत्या. फक्त पाच जागांसाठी निवडणूक लागली. परंतु निकालानंतर भालके व आवताडे गटांनी आपल्यालाच नऊ जागा मिळाल्याचा दावा केला. बोराळे येथे जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते यांच्या गटाचा पराभव करण्यासाठी विरोधातील सर्व गट एकत्र येऊन त्यांनी नकाते गटाचा पराभव केला. तर मरवडे येथे तिरंगी लढतीत सत्ताधारी गटाचा पराभव करण्यात सर्वांना यश आले. सत्ताधारी गटाने पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा केला; परंतु मतदारांनी हा दावा नाकारत नामदेव गायकवाड, लतीफ तांबोळी, दत्तात्रय गणपाटील, नामदेव घुले, राजेद्र पोतदार, श्रीकांत गणपाटील, संदीप सूर्यवंशी यांनी स्थापन केलेल्या गाव विकास आघाडीच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या. ममदाबाद, शेटफळ येथे देखील तरुणांनी स्थापन केलेल्या समविचारी आघाडीला सत्ता मिळाली. 

माजी उपसभापती दादा गरंडे यांचा पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला. परंतु ग्रामपंचायतीमध्ये विरोधी गटाच्या काही सदस्यांना हाताशी घेऊन ग्रामपंचायतीतील सत्ता समसमान ठेवली. चिठ्ठीद्वारे सरपंचपद आपल्या गटात पाडून घेण्यात यशस्वी ठरले. परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सात जागा जिंकत बहुमत प्राप्त केले. राजकारणात आपला गट संपला नसल्याचे दाखवून दिले. 

मरवडे ग्रामपंचायतीत मतदारांनी सत्ता बदल केल्याने जबाबदारी वाढली असून, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी आणून विकासाच्या बाता न मारता विकासकामे केली जातील. यात तालुक्‍यातील इतर गावांनाही सामावून घेतले जाईल. 
- लतीफ तांबोळी, 
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गटा-तटाचा विचार न करता जिल्हा परिषदेच्या विविध विकास योजनांचा निधी जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न करताना जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी दिलेल्या संधीचा लाभ घेणार आहे. 
- दिलीप चव्हाण, 
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

नदीकाठी असलेल्या अरळी ग्रामपंचायतीवर रमेश भांजे गटाला एक जागा बिनविरोध मिळाली. तर निकालात पाच जागा तर विरोधी गटाला पाच जागा मिळाल्या. त्यात उषा भांजे या एका मताने विजयी झाल्यामुळे आमदार भालके गटाला सत्ता मिळाली. 

गेल्या तीस वर्षांपासूनची असलेली बिनविरोध परंपरेची मुढवी ग्रामपंचायत तानाजी खरात यांच्या पुढाकारामुळे पुन्हा बिनविरोध झाली. त्यात सर्व महिलाच निवडून आल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com