उपळाईत दहा वर्षांनंतर आमदार शिंदे गटाची सरशी ! जनसंपर्काच्या अभावामुळे कुलकर्णी गटाचा मोठा पराभव 

अक्षय गुंड 
Monday, 25 January 2021

मागील पंचवार्षिक निवडणुकीत कै. गणेश काका कुलकर्णी पॅनेलच्या माध्यमातून कुलकर्णी गटाने ही निवडणूक लढवत पाटील गटाचा 11 पैकी 10 जागा जिंकून मोठा पराभव केला होता. कुलकर्णी गटाने ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. परंतु कुलकर्णी गटाच्या प्रमुख असलेल्या ज्योती कुलकर्णी यांचा गावाशी असलेला संपर्क गेल्या काही वर्षात कमी होत गेला. त्यामुळे गावातील सोबत असलेले सहकारी ऐन निवडणुकीत सोडून गेले. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : गणेश कुलकर्णी यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील झालेल्या माढा तालुक्‍यातील उपळाई खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून, राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे समर्थक असलेल्या पाटील गटाने 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवत विरोधी कुलकर्णी गटाचा पराभव केला आहे. ग्रामपंचायतीवर पुन्हा दहा वर्षांनंतर एकहाती सत्ता खेचून आणली आहे. 

उपळाई खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदा अत्यंत चुरशीची लढत निर्माण झाली होती. गेल्या दहा वर्षात या गावात सातत्याने घडणाऱ्या घडामोडींमुळे हे गाव जिल्ह्यात चर्चेत राहात होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत कै. गणेश काका कुलकर्णी पॅनेलच्या माध्यमातून कुलकर्णी गटाने ही निवडणूक लढवत पाटील गटाचा 11 पैकी 10 जागा जिंकून मोठा पराभव केला होता. कुलकर्णी गटाने ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. परंतु कुलकर्णी गटाच्या प्रमुख असलेल्या ज्योती कुलकर्णी यांचा गावाशी असलेला संपर्क गेल्या काही वर्षात कमी होत गेला. त्यामुळे गावातील सोबत असलेले सहकारी ऐन निवडणुकीत सोडून गेले. कै. गणेश काका कुलकर्णी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील ओढ्यातील किंवा तलावातील गाळ काढण्यास असो अथवा वाड्या-वस्त्यावरील रस्ते मुरुमीकरण ही सामाजिक कार्ये केली असताना देखील जनसंपर्काच्या अभावामुळे पार्टी प्रमुख असलेल्या ज्योती कुलकर्णी यांच्यासह पॅनेलला यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. 

आमदार बबन शिंदे यांचे समर्थक असलेले संदीप पाटील व दीपक पाटील यांनी गेल्या दहा वर्षात त्यांच्यापासून दुरावलेले गावातील विविध समाजातील प्रमुख घटक असलेल्या नेत्यांना आपलेसे केले. तसेच गावातील पाटील भावकीतील मतभेद मिटवून एकत्रित येत बेरजेचे राजकारण केले. गावासाठी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला महत्त्वाचा सीना माढा उपसा सिंचन योजनेचा पाण्याचा प्रश्न आमदार बबन शिंदे यांच्या माध्यमातून गेली वर्षभरात त्यांनी मार्गी लावला. गेल्या दहा वर्षात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली. सीना माढा योजनेचे पाणी गावाला मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न हे जनतेसमोर मांडत त्यांनी ही निवडणूक लढवली. गावातील शेतीसोबत असलेला दुग्ध व्यवसाय व त्यासाठी पाण्याची असलेली गरज ओळखून सिंचनाच्या पाण्यासाठी पाटील गटाने केलेले प्रयत्न मतदारांना भावले याची परिणती पाटील गटाच्या मोठ्या विजयात झाली. 

जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे मेहुणे संदीप पाटील यांचा विजय पाटील गटाला उभारी देणारा तर कै. गणेश कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योती कुलकर्णी यांचा पराभव कुलकर्णी गटासाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा असा आहे. 

विजयी झालेले उमेदवार... 
सविता सुनील राऊत, संतोष मनोहर जाधव, दीपक लखुजी पाटील, मनीषा सुनील हराळे, छाया पोपट कचरे, कांतिलाल बबन कदम, सविता जगन्नाथ शिंदे, शिवाजी साहेबराव गोरे, संदीप विष्णुपंत पाटील, सुनीता दिलीप कुलकर्णी, मोनिका पांडुरंग राऊत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After ten years, MLA Shinde group won the Uppalai Gram Panchayat election again