आरक्षण मागणीसाठी पंढरपुरात विविध मराठा संघटनांचे आसूड आंदोलन

भारत नागणे 
Monday, 21 September 2020

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज विविध मराठा समाज संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात पंढरपुरात आसूड आंदोलन केले. दरम्यान, गोपाळपूर व पिराची कुरोली येथे रास्ता रोको आंदोलन करत मराठा समाजातील तरुणांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज विविध मराठा समाज संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात पंढरपुरात आसूड आंदोलन केले. दरम्यान, गोपाळपूर व पिराची कुरोली येथे रास्ता रोको आंदोलन करत मराठा समाजातील तरुणांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला पंढरपुरातील व्यापारी आणि दुकानदारांनी बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दिला. येथील शिवाजी चौकात विविध मराठा संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आसूड आणि जागरण गोंधळ घालून आंदोलन केले. तर काही ठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील मार्गावरून मोर्चा काढून आंदोलन केले. गोपाळपूर येथेही आज सकाळी मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी रास्त रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

पिराची कुरोली येथे पंढरपूर - पुणे मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. संभाजी ब्रिगेडचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे यांनीही सरकारच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देण्याची मागणी केली. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील सर्व दुकाने, हॉटेल दिवसभर बंद होती. बंदमुळे लोकांची गैरसोय झाली. एसटीची वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली होती. एसटी बस स्थानकावर शुकशुकाट दिसत होता. आंदोलनादरम्यान शहर व तालुक्‍यात कुठे हिंसक घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आंदोलनामध्ये उद्योगपती अभिजित पाटील, संदीप मांडवे, स्वागत कदम, सागर यादव, जयवंत माने, संतोष कवडे, मनसेचे शशिकांत पाटील, प्रशांत शिंदे, अनिता पवार, श्रेया भोसले, कल्पना शिंगटे, सुनीता उमाटे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, माजी अध्यक्ष सुनील सर्वगोड, बहुजन वंचित आघाडीचे सागर गायकवाड आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दुपारी दीड वाजता आरक्षण मागणीचे निवेदन आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार व पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शानाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

आमदार भालकेंचा आंदोलनाला पाठिंबा 
आरक्षण मागणीसाठी आज पंढरपुरात विविध मराठा समाज संघटनांनी सरकार विरोधात आंदोलन केले. आमदार भारत भालके यांनी आंदोलनस्थळी येऊन आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. राज्यात सत्ता नसताना मी आरक्षण मागणीसाठी राजीनामा दिला होता. परंतु आता मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. आरक्षण मिळवून घेण्यासाठी सरकारला धाक दाखवण्याची माझ्यात तेवढी धमक आहे. मला राजीनामा देण्याची गरज नाही, असे सांगत सरकारलाही त्यांनी इशारा दिला. 

मनसेचीही आंदोलनात उडी 
आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाज आंदोलनाला आज मनसेने पाठिंबा देत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आंदोलनात सहभागी होत, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राज्य सरकारने पोलिस भरती रद्द करावी; अन्यथा मनसेच्या वतीने सरकारच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitations of various Maratha organizations in Pandharpur demanding reservation