esakal | सोलापुरात कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू; लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापुरात कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू; लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन 

शेतकऱ्यांनी पावती जपून ठेवावी 
शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी आपल्या गावातील सीएससी सेंटरला भेट द्यावी. त्याठिकाणी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची पावती जपून ठेवावी. 
रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 

सोलापुरात कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू; लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू झाली आहे. सध्या शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. 

या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टर चलित औजारे जसे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र, फवारणी यंत्र, पॉवर टिलर, वीडर, रिपर, कापणी यंत्र खरेदी करायचे असतील अशा शेतकऱ्यांनी शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 

ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांकडे सात-बारा, आठ-अ चा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबुक, ट्रॅक्‍टर आरसी बुक, असल्यास जातीचा दाखला, आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल ही कागदपत्रे असणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील कोणत्याही महा-इ सेवा केंद्रामध्ये शेतकरी अर्ज भरु शकतील. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत ते सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी नव्याने ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करायचे आहेत. लाभार्थी निवड लकी ड्रॉ सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. एखाद्या घटकाचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला असेल तर पुढील 10 वर्ष त्या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाही. मात्र, इतर घटकासाठी शेतकरी अर्ज करू शकतील असेही श्री. माने यांनी सांगितले.