
लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभूत झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सोलापूर शहर- जिल्ह्यातील कॉंग्रेसची संपूर्ण जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या खांद्यावर आली. मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांची मोट बांधण्याचे कौशल्य संजय शिंदे यांच्याकडेच असल्याचा विश्वास अजित पवार यांना आहे.
सोलापूर : महापालिकेत आतापर्यंत कॉंग्रेसलाच महापौरपद मिळाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपमहापौरपद मिळाले. परंतु, आता महापालिकेचे महापौरपद मिळविण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याची जबाबदारी अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्यावर सोपविल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी आज (बुधवारी) ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मानकऱ्यांसमवेत भेट घेतली. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांमार्फत यात्रेसाठी पाठपुरावा केला. त्यावरुन आता दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद सुरु झाला आहे.
प्रणिती शिंदेंनी घेतली संजय शिंदेंची धास्ती
लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभूत झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सोलापूर शहर- जिल्ह्यातील कॉंग्रेसची संपूर्ण जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या खांद्यावर आली. मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांची मोट बांधण्याचे कौशल्य संजय शिंदे यांच्याकडेच असल्याचा विश्वास अजित पवार यांना आहे. महाविकास आघाडीत प्रणितींच्या विरोधात निवडणूक लढलेल्यांची संख्या मोठी असून त्या सर्वांना सोबत घेत महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर व्हावा, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा आहे. शहराच्या राजकारणात लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य असल्याने त्यांना जोडण्याचा प्रयत्न संजय शिंदे यांनी सुरु केला आहे. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत सुरवातीला न दिसलेल्या प्रणिती शिंदे या आमदार संजय शिंदे यांच्या बैठकीत व भेटीप्रसंगी दिसल्या. त्यानंतर सिध्दरोमश्वरांच्या यात्रेनिमित्त संजय शिंदे यांनी आमदार विजयकुमार देशमुख व यात्रेच्या मानकऱ्यांसोबत बैठक घेतली. काही दिवसांतच आमदार प्रणितींनी जिल्हाधिकाऱ्यांना यात्रेसंबंधी निवेदन दिले. त्यानंतर संजय शिंदे यांनी मंत्रालय गाठून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यात्रेस परवानगी देण्याची मागणी केली. दुसरीकडे आमदार प्रणिती यांनीही आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पाठपुरावा करुन यात्रेसंबंधीचा निर्णय करुन घेतल्याचे पत्रक सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्याविरोधातील नाराजी दूर करण्यासाठी संजय शिंदे शहरात आले आहेत की राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी हे आगामी महापालिका निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सर्वाधिक ताकद असतानाही सोलापूर शहरात पंतप्रधान मोदींच्या 'अच्छे दिन'मुळे महापालिकेत भाजपची सत्ता आली. 102 नगरसेवकांमध्ये कॉंग्रेसला 14 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मातब्बर नेतेमंडळींना घरी बसावे लागले. मोडकळीस आलेल्या राष्ट्रवादीची ताकद शहरात वाढविण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय शिंदे त्यांच्यावर जबाबदारी सोपविल्याचीही चर्चा आहे. त्यादृष्टीने त्यांनी पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी शहरात प्रथम एन्ट्री केली. बदलत्या राजकारणाचा अचूक वेध घेत अपक्ष असतानाही संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील अनेक मातब्बर नेतेमंडळींची मोट बांधली. याच धर्तीवर आता संजय शिंदे यांनी एमआयएमचे नेते तौफिक शेख यांना आपलेसे करीत पदवीधर व शिक्षक आमदारकीसाठी मदत मिळविली. आता आगामी महापालिका निवडणुकीतही त्यांची मदत घेतली जाणार आहे. संघटन कौशल्य, राजकारणात चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या संजय शिंदे यांनी आता ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या निमित्ताने शहरात पुन्हा प्रवेश केला आहे. त्यांनी यात्रेस परवानगी मिळावी, पंच कमिटीची मागणी मान्य करावी, असा आग्रह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धरला. त्यानुसार पंच कमिटीची मागणी मान्य होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.