अजित पवार फक्त नामधारीच उपमुख्यमंत्री, मदतीची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा 

प्रमोद बोडके
Saturday, 17 October 2020

महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच मंत्र्यांना महाराष्ट्रातील जनतेचे देणेघेणे नाही. तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या अजित पवारांनी आज सोलापूरच्या दौऱ्यात मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करणे आवश्‍यक होते. हा दौरा फक्त फार्स ठरला आहे. महविकास आघाडीच्या या तिघाडी सरकारममध्ये अजित पवार हे फक्त नामधारीच उपमुख्यमंत्री असल्याचे सिद्ध होत आहे. 
- विजयकुमार देशमुख, आमदार, माजी पालकमंत्री, सोलापूर 

सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुराचा जबरदस्त तडाखा बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या अपेक्षेने बसला होता. महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कसल्याही मदतीची घोषणा केलेली नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून सोलापूकरांची निराशा झाली असून महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे फक्त नामधारीच उपमुख्यमंत्री असल्याचा टोला सोलापूरचे माजी पालकमंत्री भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी लगावला आहे. 

आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे विभागामध्ये सर्वात जास्त नुकसान हे सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 58 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 623 गावे जलमय झाली असून या गावातील 8 हजार 608 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एकूण 32 हजार 521 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच धार्मिक मठांमध्ये ठेवण्यात आले आहे. या बाधितांना शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. 

या अतिवृष्टीत सोळा जण मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यातून आपल्याला काही तरी मदत मिळेल या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकरी बसले होते. अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री आज काही तरी मोठी घोषणा करतील आणि आपल्या पदरी काहीतरी भरघोस मदत मिळेल परंतु या दौऱ्यात मदतीची कसलीच घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी न केल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar is only a nominal Deputy Chief Minister, ignoring the farmers who are expecting help