
बलात्कार व पोक्सो गुन्ह्यातील गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीस अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले. अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव बापू सिद्धा कुसेकर (वय 30, रा. उडगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे आहे.
अक्कलकोट (सोलापूर) : बलात्कार व पोक्सो गुन्ह्यातील गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीस अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले. अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव बापू सिद्धा कुसेकर (वय 30, रा. उडगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की संशयित आरोपी बापू कुसेकर याच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गु.र.नं.-31/2015 भा.दं.वि. क.363,366 (अ),376 (2) (आय),506 सह पोक्सो कलम 4 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. 22 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी दोनच्या दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीच्या मुलीला ती घरी एकटी असताना तिला मिरजगी फाटा ते सलगरला जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या दगडाच्या खाणीत नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने उत्तर पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी बापू सिद्धा कुसेकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून सहा वर्षे फरार होता.
आरोपीबाबत पोलिस पथकाला, तो आरोपी उडगी गावाकडून गळोरगी गावाकडे चालत जात आहे, अशी खबर मिळाल्यावर पोलिस पथक खासगी वाहनाने रवाना झाले. पोलिस गळोरगी ते उडगी रोडवरील एका शेतात दबा धरून बसले होते. तेव्हा संशयित आरोपी हा चालत येताना दिसला. पोलिसांना पाहून तो रानातून पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, पोलिस हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, विपिन सुरवसे, पोलिस नाईक महादेव चिंचोळकर यांनी केली.
संपादन : श्रीनिवास दुध्याल