अकलूजवरील मोहिते-पाटलांची पकड होतेय सैल ! एकूण मतदानापैकी 47 टक्के मतदान गेले विरोधात 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 19 January 2021

अकलूजमधील मताधिक्‍यात हळूहळू घट होत असल्याचे या ग्रामपंचायत निवडणुकीवरून दिसून येते. ही बाब रणजितसिंह व धैर्यशील यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. रणजितसिंह व धैर्यशील यांची आता पुढील सर्वच निवडणुकीत स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कस लागणार आहे. 

सोलापूर : अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी जवळपास 47 टक्के मतदान विरोधात गेल्याने आमदार रणजितसिंह व धैर्यशील मोहिते- पाटील यांना हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. त्यांनी अकलूजमध्ये सत्ता राखण्यात यश मिळवले असले तरी मतदारांनी संग्रामसिंह मोहिते- पाटील यांचा सणसणीत पराभव करून चांगलीच चपराक लगावली आहे. अकलूजमध्ये नगरपरिषद होऊ घातली आहे. प्रस्तावित नगरपरिषदेसह भविष्यातील विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी रणजितसिंह व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हा निकाल धोक्‍याचा इशारा असल्याचे मानले जाते. 

अकलूज ग्रामपंचायतीमध्ये 14 हजार 307 पुरुष व 14 हजार 238 स्त्री असे एकूण 28 हजार 545 मतदान आहे. यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यापैकी 58.71 टक्के म्हणजे 16 हजार 759 मतदान झाले. रणजितसिंह व धैर्यशील मोहिते- पाटलांच्या गटाने 17 पैकी 14 जागा जिंकून सत्ता काबीज केली खरे; मात्र झालेल्या मतदानापैकी सात हजार 952 म्हणजे 47 टक्के मतदान सर्व विरोधातील उमेदवारांना गेले आहे. डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्या परिवर्तन पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले असले तरी ही निवडणूक त्यांचे बळ वाढविणारी ठरली आहे. त्यामुळे रणजितसिंह व धैर्यशील यांच्या चिंतेत भर पडली आहे. विरोधात झालेल्या मतदानाचा वाढता टक्का आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदारांनी आपली भूमिका बदलल्याचे अधोरेखित करतो. रणजितसिंह व धैर्यशील यांच्या पॅनेलच्या विरोधात डॉ. धवलसिंह यांच्या पॅनेलला एकास एक उमेदवार देण्यात यश आले असते तर निकाल आणखी धक्कादायक लागले असते. 

विजयसिंह, जयसिंह, रणजितसिंह व धैर्यशील मोहिते पाटलांचा अकलूज हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सत्तेचा लवलेशही नसताना डॉ. धवलसिंह, फत्तेसिंह माने पाटील, पांडुरंग देशमुख यांनी शर्थीने ही खिंड लढवत बालेकिल्ल्यास सुरुंग लावल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे यांना अकलूजच्याच नव्हे तर माळशिरस तालुक्‍याच्या राजकारणाची दिशा मिळाली आहे. 

पूर्वी माळशिरस तालुक्‍याच्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटलांना ऍड. सुभाष पाटील यांनी तीन वेळा जोरदार टक्कर दिली होती. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोहिते पाटलांच्या विरोधातील उमेदवारांना मताधिक्‍य मिळत असायचे. अकलूजमध्ये मोहिते पाटलांचे एकहाती सत्ता व प्राबल्य असल्याने विधानसभा निवडणुकीची अकलूजमधील मतमोजणी सुरू झाली की ते "लीड' तुटायचे. परिणामी मोहिते पाटलांचा विजय सुकर व्हायचा. माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर तर मोहिते पाटलांचा उमेदवार व त्यांच्या विरोधी उमेदवार यांच्यातील मतांमधील अंतर आणखी कमी होत गेले. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील राम सातपुते यांना अकलूजमध्ये काठावरचे लीड मिळाल्यानेच राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा अल्प मतांनी पराभव झाला. अकलूजचे मतदान विधानसभाच नव्हे तर लोकसभेची निवडणूक फिरवते, हे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. अकलूजमधील मताधिक्‍यात हळूहळू घट होत असल्याचे या ग्रामपंचायत निवडणुकीवरून दिसून येते. ही बाब रणजितसिंह व धैर्यशील यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. रणजितसिंह व धैर्यशील यांची आता पुढील सर्वच निवडणुकीत स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कस लागणार आहे. त्यासाठी त्यांना तालुक्‍यातील प्रत्येक गावात पायखत घालण्याची गरज आहे. 

तालुक्‍यातील समस्या 

  • उन्हाळ्यातील सिंचनाचा प्रश्न 
  • तालुक्‍यात उद्योगनिर्मिती आवश्‍यक 
  • भरकटलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची गरज 
  • रेल्वेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akluj the Mohite Patil faction got a very low turnout in Gram Panchayat election