"लंपी'मुळे अकलूजचा जनावरांचा बाजार आजपासून बंद ! शेळ्या-मेंढ्यांचा बाजार राहणार सुरू 

शशिकांत कडबाने 
Monday, 30 November 2020

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार आजपासून बंद केला असून, फक्त शेळ्या-मेंढ्यांचा बाजार चालू राहणार असल्याची माहिती सभापती मदनसिंह मोहिते - पाटील यांनी दिली. 

अकलूज (सोलापूर) : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार आजपासून बंद केला असून, फक्त शेळ्या-मेंढ्यांचा बाजार चालू राहणार असल्याची माहिती सभापती मदनसिंह मोहिते - पाटील यांनी दिली. 

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जनावरांचा मोठा बाजार भरला जातो. अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी जनावरे खरेदीसाठी येथे येत असतात. दर सोमवारी भरणाऱ्या या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते. सुमारे सात महिन्यांच्या बंदनंतर जनावरांचा बाजार चालू करण्यात आला. परंतु, जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला. हा रोग संसर्गजन्य असून, त्याचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने बाजार बंद करण्याचे आदेश काढले असल्याने केवळ सात ते आठ आठवडे बाजारानंतर पुन्हा बाजार बंद करण्यात आला आहे. 

अकलूज व परिसरातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी याबरोबरच शेळ्या, मेंढ्या, बोकडे, कोंबड्या असतात. अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने यातील काही जनावरे ही बॅंकेत ठेवलेली मुदत ठेवच असते. जेव्हा पैशाची अत्यंत गरज भासते तेव्हा बाजारात नेऊन विकली जातात. परंतु, बाजार बंद असल्याने जनावरे विकता येणार नसल्याने खत खरेदीसाठी अथवा उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडणारी व सहज रोख पैशात रूपांतरित होणारी ही ठेव बिनकामाची ठरते आहे. तसेच काही शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी दूध-दुभत्यासाठी जनावरे खरेदी करावयाची असतात. त्यांनाही यामुळे अडचणी येणार आहेत. तसेच अकलूज व परिसरात 200 पेक्षा अधिक जनावरांचे व्यापारी आहेत. त्यांना पुन्हा मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीने लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत हा बाजार बंद राहणार असल्याचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aklujs animal market will be closed from today due to Lampi disease