जिल्ह्यातील 'या' चार तालुक्‍यांमधील सर्वच नागरिकांना मिळणार मोफत लस

तात्या लांडगे
Thursday, 4 March 2021

ठळक बाबी... 

 • महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी 
 • दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच करता येईल लसीकरण 
 • खासगी रुग्णालयांनी शंभरजणांचे 15 हजार रुपये भरल्यानंतरच मिळणार लसीकरणाची परवानगी 
 • आतापर्यंत सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अकलूज, मंगळवेढ्यातील 13 रुग्णालयांमध्ये सुरु झाले लसीकरण 
 • उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांतील नागरिकांसाठी शहरातील रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय 
 • - एका रुग्णालयातून दररोज शंभर लोकांनाच कोरोनावरील लसीचा पहिला डोस दिला जाईल  

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा आता सुरु झाला असून 45 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्णांना लस टोचली जात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली असून त्याठिकाणी अडीचशे रुपये भरून लस टोचावी लागणार आहे. परंतु, जिल्ह्यातील मोहोळ, करमाळा, अक्‍कलकोट आणि सांगोला या तालुक्‍यांत जनआरोग्य योजनेतील एकही दवाखाना नसल्याने त्याठिकाणी शासकीय रुग्णालयांमधूनच सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.

ठळक बाबी... 

 • महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी 
 • दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच करता येईल लसीकरण 
 • खासगी रुग्णालयांनी शंभरजणांचे 15 हजार रुपये भरल्यानंतरच मिळणार लसीकरणाची परवानगी 
 • आतापर्यंत सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अकलूज, मंगळवेढ्यातील 13 रुग्णालयांमध्ये सुरु झाले लसीकरण 
 • उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांतील नागरिकांसाठी शहरातील रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय 
 • - एका रुग्णालयातून दररोज शंभर लोकांनाच कोरोनावरील लसीचा पहिला डोस दिला जाईल  

सोलापूर शहर-जिल्ह्यातील अश्‍विनी सहकारी रुग्णालय, अश्‍विनी कुंभारी ग्रामीण रुग्णालय, मार्कंडेय, यशोधरा, सिध्देश्‍वर कॅन्सर हॉस्पिटल, बार्शीतील सुश्रूत हॉस्पिटल, सुविधा आयसीयु, (कॅटलॅब), जगदाळे मामा, अकलूजमधील क्रिटीकेअर व कदम हॉस्पिटल, पंढरपूरमधील लाईफलाईन, व गॅलक्‍सी हॉस्पिटल आणि मंगळेवढ्यातील महिला हॉस्पिटल, यांनी प्रत्येकी 15 हजार रुपये भरले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये आता नागरिकांना लस टोचून घेता येणार असल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिली. जिल्ह्यातील 43 रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत. या रुग्णालयांना शंभर रुग्णांसाठी 15 हजार रुपये भरावे लागणार असून त्यानंतरच त्यांना लसीकरणाची परवानगी दिली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लस टोचून घेणे हे ऐच्छिक आहे, परंतु कोरोना होऊ नये म्हणून सर्वांनी लस टोचायलाच हवी, असे आवाहनही डॉ. पिंपळे यांनी केले. पहिला डोस घेतल्यानंतर संबंधितांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार असून तत्पूर्वी, त्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले. 

  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: All the citizens of these four talukas of the district will get free vaccine