दोन जिल्हे वगळता अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये ! कार्यालये अन् शाळा सुरु करण्यापूर्वी सरकार घेणार 'हे' मोठे निर्णय...

तात्या लांडगे
शुक्रवार, 29 मे 2020

31 मेपूर्वी मुख्यमंत्री घेतील निर्णय

राज्यातील धोरणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून संख्या 60 हजारांपर्यंत आली आहे. कोरोनाची लागण आणि मृत्यू पावणारे सर्वाधिक व्यक्ती वयोवृद्ध असून त्यांना हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे पूर्वीचे आजार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारी कार्यालये सुरू करण्यापूर्वी अशा व्यक्तींना आराम द्यायचा की नाही अथवा त्यांची काळजी कशी घेता येईल, याबाबतचा निर्णय दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर करतील.
- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री 

सोलापूर : लॉकडाउन चारवेळा वाढवूनही रुग्ण संख्या कमी होत नसल्याने आता योग्य ती खबरदारी घेऊन राज्य सरकार शिथिल  करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारी व खासगी कार्यालये व शाळा सुरु करण्यापूर्वी 55 वर्षांवरील विशेषतः ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आराम देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. तर शाळा सुरु करण्याचा मुहूर्त 15 जूनऐवजी आणखी काही दिवस पुढे ढकलला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
 

राज्यातील ऑरेंज झोनमधील वाशीम व वर्धा जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्र सद्यस्थितीत रेड झोनमध्ये पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्येने आता 60 हजाराचा टप्पा ओलांडला असून सुमारे दोन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होणाऱ्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग असे विकार असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील कोरोनाचे वैश्विक संकट हद्दपार करण्याच्या हेतूने मागील 67 दिवसांपासून (22 मार्च) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत होतील, असा विश्वास होता. मात्र, परस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी, राज्यातील पोलीस दलातील सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यात काहींचा मृत्यूही झाला. त्यानंतर खबरदारी म्हणून गृहमंत्रालयाने 55 वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्यास सांगितले. तर 30 टक्के कर्मचाऱ्यांना आलटून-पालटून आराम दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत सरकारी कार्यालयातील 55 वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आराम देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली. मात्र, ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग असे विकार आहेत, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असेही सांगण्यात आले.
 

14 शहर-जिल्ह्यांमध्ये रुग्णांचा वाढतोय वेग

22 मार्चपासून आतापर्यंत चारवेळा लॉकडाऊन करूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वरून 60 हजारांवर पोहचली आहे. त्यामध्ये एकट्या मुंबई महानगरपालिका परिसरामध्ये 35 हजार 485 रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत 25 हजार 694 रुग्ण उपचार घेत आहेत. त्या पाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात आठ हजार 220 रुग्ण सापडले असून सध्या पाच हजार 765 रुग्ण उपचार घेत आहेत तर पुण्यामध्ये सहा हजार 896 रुग्ण सापडले असून तीन हजार 353 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार 370 रुग्ण सापडले असून 431 रुग्ण उपचार घेत आहेत. सोलापुरातील 822 रुग्णांपैकी 501 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातील 944 पैकी 428 रुग्णांवर उपचार सुरू असून पालघर जिल्ह्यातील 825 पैकी 529 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नाशिक जिल्ह्यातील 1043 रुग्णांपैकी 236 रुग्णांवर उपचार सुरू असून जळगाव जिल्ह्यातील 526 पैकी 235 रुग्ण उपचार घेत आहेत. साताऱ्यातील 429 पैकी 285 रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर कोल्हापुरातील 351 रुग्णांपैकी 314 रुग्ण दवाखान्यांमध्ये उपचार घेत असून रत्नागिरीतील 204 पैकी 123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच अकोल्यातील 529 पैकी 250 रुग्णांवर उपचार सुरू असून नागपुरातील 495 पैकी 150 रुग्ण दवाखान्यांमध्ये दाखल आहेत.

ज्या त्या जिल्ह्यांनी घ्यावी खबरदारी 

राज्यातील 10 ते 12 शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यातील प्रशासनाने नागरिकांना सोशल डिस्टन्सचे पालन करणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे अशा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सातत्याने करावे. प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करून कोरोनाबाधित रुग्णांच्या कॉन्टॅक्टमधील रुग्ण तत्काळ शोधणे गरजेचे आहे. जेणेकरून या विषाणूचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
- अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

ठळक मुद्दे...
- राज्यातील चार लाख 29 हजार संशयितांची कोरोना टेस्ट; आतपर्यंत 193 कोटींचा झाला खर्च 

- राज्यात सद्यस्थितीत 2616 प्रतिबंधित क्षेत्र; सुमारे 67 लाख लोकसंख्येचे पूर्ण झाले सर्वेक्षण

- राज्यातील 60,000 रुग्णांपैकी 39 हजारांहून अधिक रुग्ण दवाखान्यांमध्ये घेत आहेत उपचार

- एक हजार 982 रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू ; वाशीम, वर्धा जिल्हा वगळता अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Maharashtra except two districts in red zone! The government will take big decision before starting offices and schools