सांगोला तालुक्‍यात राष्ट्रवादी, शिवसेनाविरुद्ध शेकापच्या सरळ लढती ! अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला 

दत्तात्रय खंडागळे 
Wednesday, 13 January 2021

सांगोला तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. राहिलेल्या 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपातळीवर अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोचला आहे. या निवडणुकीत अनेक गावांत बहुतांश ठिकाणी शेकाप विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती असली तरी गरजेनुसार युती, आघाडी करून निवडणूक लढविली जात असल्याचे दिसून येत आहे. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील 61 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. राहिलेल्या 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपातळीवर अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोचला आहे. या निवडणुकीत अनेक गावांत बहुतांश ठिकाणी शेकाप विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती असली तरी गरजेनुसार युती, आघाडी करून निवडणूक लढविली जात असल्याचे दिसून येत आहे. तरी काही गावांत आपल्याच पक्षातील उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले असल्याने स्थानिक आघाड्यांना प्राधान्य राहिले आहे. 

तालुक्‍यातील 61 पैकी मेथवडे, चोपडी, तिप्पेहळ्ळी, गायगव्हाण, वाटंबरे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून, 1279 उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. तालुक्‍यात अनेक गावांत शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांतील नेते, कार्यकर्ते आपल्या सोयीनुसार युती, आघाड्या करून निवडणूक लढवत असल्याचे दिसून येत आहेत. बहुतांश गावांत विधानसभेच्या निवडणुकीतील राजकीय परिस्थितीनुसार माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील व आमदार शहाजीबापू पाटील हे दोन्ही गट एकत्रित शेकापविरुद्ध निवडणूक लढवीत आहेत. तर काही गावांत शेकापविरुद्ध शेकाप अशीही लढत पाहावयास मिळत आहे. 

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व शेकाप आघाडी अशी लढत होत आहे. कोळे येथे शेकापविरुद्ध सर्व प्रमुख विरोधी पक्ष अशी लढत होत आहे. मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना असे एकत्रित येऊन विरोधातही तिन्ही पक्षांतील उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. घेरडी येथे शेकापविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी रासपने आपले उमेदवार उभे केले आहेत. डिकसळ, वाणी चिंचाळे, आगलावेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, बुरंगेवाडी, नराळे, पारे येथे शेकापविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होत आहे. अनेक ठिकाणी अपक्षही निवडणुकीत उतरल्याने निवडणुकीत उत्कंठा वाढली आहे. 

जुनोनी, बुद्धेहाळ, बामणी, मांजरी, संगेवाडी, चिंचोली, शिरभावी, धायटी, एखतपूर, वाकीशिवणे, ह. दहिवडी, कटफळ, य. मंगेवाडी, वाकी घेरडी, ह. मंगेवाडी यासह सर्वच गावांत गाव कारभारी निवडून देण्यासाठी चुरस दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या चिन्ह यादीत राजकीय पक्षांची चिन्हे वगळून 190 चिन्हांचा समावेश आहे. यात खटारा, शिटी, कपबशी, अंगठी, कंगवा, कपाट, बॅट, गॅस सिलिंडर, रिक्षा, इस्त्री, चावी, छत्री आदी चिन्हे असून या चिन्ह वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करून चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवार चिन्हांची चित्रे, खेळण्यातील साहित्य दाखवून मते मागत आहेत. 

हॉटेल, ढाब्यांवर वाढली गर्दी 
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अनेक गावांजवळील हॉटेल्स, ढाब्यांवर सध्या गर्दी वाढू लागली आहे. गावापेक्षा अशा जेवणावळीच्या ठिकाणी बैठका, चर्चा विनिमय जोरदार सुरू झाले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अशा ओल्या-सुक्‍या पार्ट्या जोरदार रंगत आहेत. 

मोठी कर वसुली 
सांगोला तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी घरपट्टी 44 लाख 83 हजार तर पाणीपट्टीची 38 लाख 30 हजार असा एकूण सुमारे 83 लाख 24 हजार कर भरल्याने ग्रामपंचायतीच्या खात्यात मोठा महसूल जमा झाला आहे. 

सोशल मीडियावर प्रचाराची भर 
ग्रामपंचायतीमधील आपल्या पॅनेलला मते मिळावीत, उमेदवार निवडून यावेत यासाठी सोशल मीडियावर जोरदार प्रचार केला जात आहे. फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर विविध प्रकारची गाणी, शेरोशायरी लिहून आपल्याच विकासाच्या माणसाला निवडून द्या, असे आवर्जून सांगितले जात आहे. गावात क्वचितच दिसणारे अनेक जण भावी सरपंच, विकासाचे महामेरू अशी उपमा देऊन प्रचार केल्याने यावर सोशल मीडियावर मोठी टीकाटिप्पणीही होत आहे. 

घरोघरी जाऊन प्रचारावर भर 
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दिवसापेक्षा रात्रीच्या प्रचारावर उमेदवारांची मोठी भर आहे. सायंकाळच्या वेळेस गावात प्रचार फेरी, सभा, बैठका होत आहेत. तर त्यानंतर जेवणावळीच्या माध्यमातून तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन उमेदवार, पॅनेल प्रमुख, नेतेमंडळी करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All parties have entered the fray in the Gram Panchayat elections in Sangola taluka