मोहोळ नगर परिषदेच्या नियोजित इमारतीची जागा आरोप-प्रत्यारोपांच्या जाळ्यात !

चंद्रकांत देवकते 
Friday, 23 October 2020

शहरातील आठवडा बाजाराच्या परिसरात नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या मंजुरीसाठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत राष्ट्रवादी व आघाडीने बहुमताने आठ विरुद्ध पाच असा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले. तर राष्ट्रवादीच्याच तीन नगरसेवकांसह भाजपच्या एका नगरसेवकाने बैठकीला अनुपस्थिती दाखवत महाभारतातल्या "नरो वा कुंजरो वा'सारखी भूमिका घेत बैठकीलाच गैरहजर राहणे पसंत केले. 

मोहोळ (सोलापूर) : शहरातील आठवडा बाजाराच्या परिसरात नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या मंजुरीसाठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत राष्ट्रवादी व आघाडीने बहुमताने आठ विरुद्ध पाच असा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले. तर राष्ट्रवादीच्याच तीन नगरसेवकांसह भाजपच्या एका नगरसेवकाने बैठकीला अनुपस्थिती दाखवत महाभारतातल्या "नरो वा कुंजरो वा'सारखी भूमिका घेत बैठकीलाच गैरहजर राहणे पसंत केले. परिणामी इमारत होण्याआधीच इमारतीची जागा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या जाळ्यात अडकली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी साडेचार कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. पण नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठी किमान पंधरा हजार स्क्‍वेअर फूट जागा नगर परिषदेच्या मालकीची असायला हवी! त्या अनुषंगाने मागील बैठकीत सत्ताधाऱ्यांनी ज्या चार जागा सुचविल्या होत्या, त्यापैकी आठवडा बाजाराची जागा भोगवटादार नगर परिषदेच्या मालकीची असल्याने त्या जागेत इमारत बांधण्याबाबत सत्ताधारी प्रयत्नशील होते. तर सदरची इमारत आहे त्याच ठिकाणी राहावी यासाठी विरोधक शिवसेनेचा अट्टहास होता. या निर्णयाविरोधात नगरसेविका सीमा पाटील, नगरसेवक सत्यवान देशमुख, माजी तालुका प्रमुख काका देशमुख यांनी स्वतंत्रपणे वेगवेगळी भूमिका मांडत नगर परिषदेच्या नियोजित स्थलांतराला कडवा विरोध केला आहे. 

वैचारिक वादविवाद टोकाला गेल्यास कागदोपत्रीच राहणार इमारत 
एकंदरीत शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नगर परिषदेच्या नियोजित नवीन इमारती संदर्भात राजकीय चर्चेतून होत असलेले आरोप - प्रत्यारोप पाहता, सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्याचे राजकीय भांडवल कसे करता येईल याचाच आटोकाट प्रयत्न दोन्ही बाजूने होत असून, वैचारिक वादविवाद टोकाला गेल्यास कदाचित यापूर्वी मोहोळ शहरासाठी फक्त कागदोपत्रीच मंजूर राहिलेल्या ट्रामा सेंटर, एसटी डेपो, क्रीडा संकुलासारखीच अवस्था नियोजित नगर परिषदेच्या इमारतीबाबत होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. 

याबाबत नगराध्यक्षा शाहीन शेख म्हणाल्या, नगर परिषदेच्या नवीन इमारतीसाठी आवश्‍यक तांत्रिक बाबींची पूर्तता आठवडा बाजाराच्या जागेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या भव्य-दिव्य इमारतीचा मंजूर निधी परत जाऊ नये यासाठी शहराच्या हद्दीतीलच आठवडा बाजाराची जागा सर्वानुमते ठरवलेली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegations are being made for the site of the planned building of Mohol Municipal Council