तीन दिवसांत 59 रुग्ण आढळूनही अवघे 12 जणच क्‍वारंटाईन ! आरोग्य अधिकाऱ्यांची अजब उत्तरे

तात्या लांडगे
Monday, 26 October 2020

क्‍वारंटाईनची सद्यस्थिती (26 ऑक्‍टोबर)

 • होम क्‍वारंटाईन
 • 28,472
 • कालावधी पूर्ण
 • 28,382
 • सध्या होम क्‍वारंटाईन
 • 90
 • इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन
 • 14,273
 • कालावधी पूर्ण
 • 12,337
 • सध्या इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन
 • 35

सोलापूर : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार शहरात एका रुग्णामागे शेजारील, बाहेरील व घरातील त्याच्या थेट संपर्कातील किमान सात ते दहा संशयितांना क्‍वारंटाईन केले जात होते. मात्र, 24 ते 26 ऑक्‍टोबर या तीन दिवसांत शहरात 59 रुग्णांची भर पडली असतानाही अवघ्या 12 जणांनाच क्‍वारंटाईन केल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. घरातील व्यक्‍ती पॉझिटिव्ह आल्यानंतर 14 दिवस कोविड केअर सेंटरला घेऊन जातात म्हणून अनेकजणांनी त्याठिकाणी राहत नसल्याचे सांगून तिथून काही दिवसांसाठी काढता पाय घेतल्याच्या चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळाली. मात्र, अशांवर फौजदारी कारवाईचा इशारा आयुक्‍तांनी देऊनही कोणावरच कारवाई झाली नाही. दुसरीकडे त्या घरात रुग्ण एकटाच राहत असेल, त्याच्या घरात कमी व्यक्‍ती असतील किंवा तो बाहेर पडलाच नसेल, अशी उत्तरे महापालिकेचे अधिकारी देऊ लागले आहेत.

 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातून त्याच्या कुटुंबातील तथा बाहेरील संपर्कातील व्यक्‍तींना कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी महापालिकेने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली. त्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईही केली. मात्र, शहरातील काही नागरी आरोग्य केंद्रांमध्ये अजब प्रकार सुरु असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आजवर शहरातील 28 हजार 472 संशयितांपैकी आता केवळ 90 जण होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 35 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये असल्याचे महापालिकेच्या अहवालावरुन स्पष्ट होते. तीन दिवसांत रुग्णांच्या संपर्कातील सात संशयितांना होम क्‍वारंटाईन तर अवघ्या पाचजणांना इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये ठेवण्याल्याचेही समोर आले आहे. विशेषत: 25 ऑक्‍टोबरला होम क्‍वारंटाईनमध्ये 28 हजार 382 संशयित होते, तर कालावधी पूर्ण केलेल्यांची संख्या त्याहून अधिक 28 हजार 470 असल्याची चूक अहवालात झाली आहे. तर सद्यस्थितीत इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमधील व्यक्‍तींची संख्या 14 हजार 273 असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद आहे. तर त्यातील 12 हजार 337 संशयितांनी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर आता अवघे 35 जण शिल्लक राहिल्याचा नवा शोध त्या अहवालातून लावण्यात आला आहे. या आकडेवारीबाबत संशय निर्माण होऊ लागला असून त्यावर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी स्पष्टपणे काहीच बोलू शकले नाहीत. यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्यांची माहिती एका महिन्यानंतर अहवालात अचानक वाढविल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

क्‍वारंटाईनची सद्यस्थिती (26 ऑक्‍टोबर)

 • होम क्‍वारंटाईन
 • 28,472
 • कालावधी पूर्ण
 • 28,382
 • सध्या होम क्‍वारंटाईन
 • 90
 • इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन
 • 14,273
 • कालावधी पूर्ण
 • 12,337
 • सध्या इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन
 • 35

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Although 59 patients were added to the city in three days, only 12 were quarantined, the report said