पद गेले असले तरी समाजकारण, राजकारणात सक्रिय : राजेंद्र मिरगणे

प्रशांत काळे
Wednesday, 9 September 2020

राजेंद्र मिरगणे म्हणतात... 

  • 18 महिन्याच्या कालावधीत 65 हजार घरांना मंजूरी 
  • सोलापूर जिल्ह्यात 10 हजार घरे मंजूर 
  • पोलिस, होमगार्डसाठी विशेष प्रकल्पांना मंजूरी 
  • मानधन घेतले नाही 
  • आठ महिने काम करण्याची संधी दिल्याबद्दल ठाकरे सरकारचे आभार 
  • उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांचेही लाभले सहकार्य 
  • बार्शी झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संकल्पाला खिळ बसल्याची खंत 

बार्शी (सोलापूर) : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्तिक उपक्रमांत राज्यातील बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्य करताना सहअध्यक्ष पदावरुन राजेंद्र मिरगणे यांना बाजूला सारल्यानंतर गेल्या 18 महिन्यामध्ये 65 हजार घरांना मंजूरी दिल्याचे सांगत यापुढेही समाजकारण, राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी बार्शी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 
श्री. मिरगणे म्हणाले, गरिबांना परवडणारी घरे उभी करायची. राज्यात 5 लाख घरे 2022 पर्यंत पूर्ण करायची हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन या महामंडळाच्या सहअध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतली होती. काम करण्यास अल्प कालावधी मिळाला, पण मिळालेल्या कार्यकाळात राज्यात 65 हजार बेघरांना घरे देण्याच्या दृष्टिने पाऊल टाकल्याचे समाधान आहे. सोलापूर जिल्ह्यात 10 हजार घरे मंजूर झाली. यामध्ये पोलिस व होमगार्डसाठी विशेष गृहप्रकल्पांचा समावेश आहे. या कार्यकाळात स्मार्ट व्हिलेजच्या माध्यमातून समूह गृहप्रकल्प, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गृहप्रकल्प, माजी सैनिकांसाठी गृहप्रकल्प असे अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कामावर विश्वास दर्शवला. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनीही माझ्या कार्यास पाठबळ दिले. नुकतेच सर्व मान्यवरांसमोर लॉकडाउननंतर बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबतचे सादरीकरण केले. महामंडळाचे काम निरपेक्ष भावनेने केले. अनेकांनी आग्रह केला तरीही कोणतेही मानधन घेतले नाही. साधा प्रवास खर्चही कधी घेतला नाही. बार्शी झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संकल्पाला खिळ बसू नये, अशी माझी इच्छा आहे. आगामी काळातही समाजकारण, राजकारणाचा वसा सुरूच राहील. पद गेल्याचे कसलेही दु:ख मनात नाही. मी कधीच पदासाठी काम केले नाही, अशीही प्रतिक्रियाही मिरगणे यांनी यावेळी व्यक्त केली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Although the post is gone sociology active in politics say Rajendra Mirgane