जिल्ह्यातील सर्वांत तरुण ग्रामपंचायत आंबे ! 15 वर्षांच्या सत्तेला लावला तरुणांनी सुरुंग 

भारत नागणे 
Thursday, 21 January 2021

आंबे ग्रामपंचायतीवर यापूर्वी काळे - परिचारक गटाची सत्ता होती. सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक अण्णा शिंदे यांची ग्रामपंचायतीवर गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता होती. या निवडणुकीत स्वतः अण्णा शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, नव्यानेच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सर्व तरुण हे 21 ते 35 वयोगटातील आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या सत्तेला सुरुंग लावत आंबे (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीवर तरुणांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. 
विशेष म्हणजे, विजयी झालेले उमेदवार सर्वांत तरुण आहेत. त्यामुळे आंबे ही जिल्ह्यातील सर्वांत तरुण ग्रामपंचायत ठरली आहे. 

पंढरपूर तालुक्‍यातील आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत दर्लिंग युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळविला आहे. प्रस्थापितांच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून येथील युवक वर्गाने इतिहास घडविला आहे. ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 7 जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

दर्लिंग युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून येथील 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत, प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे. या पॅनेलचे प्रमुख दत्ता सावंत, जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नितीन शिंदे, शिवाजी भोसले आणि सुजित शिंदे यांनी जोरदार फिल्डिंग लावून मोठा विजय मिळविला आहे. या निवडणुकीत 11 पैकी 7 जागा जिंकून आंबे ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली आहे. 

आंबे ग्रामपंचायतीवर यापूर्वी काळे - परिचारक गटाची सत्ता होती. सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक अण्णा शिंदे यांची ग्रामपंचायतीवर गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता होती. या निवडणुकीत स्वतः अण्णा शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, नव्यानेच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सर्व तरुण हे 21 ते 35 वयोगटातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांत तरुण ग्रामपंचायत ठरली आहे. 

यामध्ये अशोक मुरलीधर शिंदे, श्रीरंग विठोबा कोळी, निषाल बापू शिंदे, शोभा सदाशिव खिलारे, प्राजक्ता सुशील सावंत, गणेश मारुती कांबळे आणि कुसूम महादेव कांबळे हे तरुणतुर्क उमेदवार विजयी झाले आहेत. यापैकी काही सदस्य हे एमपीएस्सी परीक्षेची तयारीही करत आहेत, तर काही उच्चशिक्षित आहेत. प्रथमच उच्चशिक्षित आणि तरुण चेहऱ्याची पंचायत निवडून आल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

युवा वर्गाने उभारलेल्या या पॅनेलमधील सर्वच विजयी उमेदवार 35 वर्षांच्या आतील असल्यामुळे ही ग्रामपंचायत राज्यात सर्वांत तरुण ग्रामपंचायत ठरण्याची शक्‍यता आहे. 

निवडणुकीपूर्वीच आंबे ग्रामपंचायत बिनविरोध करावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. सत्ताधारी गटाकडे केवळ एका जागेची मागणी केली होती, तीही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर गावातील सर्व तरुणांनी एकत्रित येत निवडणूक लढवली, असे सुजित शिंदे यांनी सांगितले. 

निवडणुकीत येथील दिलीप कोळी, सखाराम शिंदे, तानाजी शिंदे, नवनाथ शिंदे, नागनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब राजेंद्र शिंदे, अर्जुन कोळी, समाधान अंकुश शिंदे, विजय माळी, नाना शिंदे, मनीष खिलारे, संभाजी कांबळे, बापू शेंडे, युवराज सावंत आदी युवक सहभाग झाले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambe Gram Panchayat became the youngest Gram Panchayat in Solapur district