ब्रेकिंग ! ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात केला प्रवेश

श्रीनिवास दुध्याल 
Monday, 31 August 2020

अखेर प्रशासनाने ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी दिली. सोबत काही मोजक्‍या जणांसह ऍड. आंबेडकरांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. 

पंढरपूर (सोलापूर) : भाविकांसाठी राज्यातील मंदिरे खुली करा, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असून शासनाने आम्हाला मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. अखेर प्रशासनाने त्यांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी दिली. सोबत काही मोजक्‍या जणांसह ऍड. आंबेडकरांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. 

या वेळी ऍड. प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, अशोक सोनोने, रेखा ठाकूर, तुकाराम महाराज भोसले, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, 
विकी शेंडगे, अमित भुईगळ यांनी दोन टप्प्यांत दर्शन घेतले. 

या वेळी ऍड. आंबेडकर म्हणाले, श्री विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. मंदिर भाविकांना खुले करण्यासंदर्भात कार्य प्रणाली तयार करून आठ दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. यामुळे आठ दिवस प्रतीक्षा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

या वेळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करत मंदिर प्रवेशासाठी परवानगी दिली याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले. याबरोबरच राज्यातील प्रार्थनास्थळे लवकरच खुली केली जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambedkar thanked the Chief Minister for allowing him to visit Vitthal