ब्रेकिंग ! मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा मोहोळ येथे भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी 

चंद्रकांत देवकते
Saturday, 14 November 2020

पुण्याहून सोलापूरकडे मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने समोरच्या मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. 

मोहोळ (सोलापूर) : पुण्याहून सोलापूरकडे मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने समोरच्या मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. 

जखमींची नावे समजू शकली नाहीत. हा अपघात शनिवारी (ता. 14) पहाटे 3.45 वाजता सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहराजवळील कन्या प्रशाला चौकात झाला. रवी माणिक राठोड (वय 38, रा. माळवाडी, पुणे), बुद्वीबाई चन्ना पालत्या (वय 48, रा. माळवाडी) व एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज (पुणे) येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या सुकट्या नूरयॉं खतरावत यांचे अपघातामुळे निधन झाल्याने त्यांचा मृतदेह घेऊन त्यांचे नातेवाईक पुण्याहून रुग्णवाहिकेने (एम.एच. 12 आर.एन. 6387) तेलगंणकडे चालले होते. पहाटे तीनच्या सुमारास मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकात येताच पुण्याहून हैदराबादला चाललेल्या मालट्रकला (एमएच 43 बीजी 4500, चालक नागनाथ गंगादर कदम वय 40, मळेगाव, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) पाठीमागून जोराची धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील रवी माणिक राठोड (वय 38, रा. वारजेवाडी, जि. पुणे), बुद्धीबाई चन्ना पालत्या (वय 48) यांचे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच निधन झाले. तर उपचारादरम्यान अन्य एकाचे निधन झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

रुग्णवाहिकेतील इतर दहाजण जखमी आहेत. जखमीपैकी रामलू धनसिंग राठोड (वय 45), रामलू सोमनाथ राठोड, आशा सुभाष राठोड (वय 40), लोकेश धनसिंग राठोड (वय 39), किसन रामलू राठोड (वय 39), नीलेश भानू पवार (वय 30), किसन नारायण राठोड (वय 40), असलीबाई किसन राठोड (वय 38) व अन्य (सर्व राहणार वारजेवाडी, पुणे) यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, अपघात झाल्याचे समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिस निरीक्षक अशोक सायकर, अवी शिंदे, गणेश दळवी, मंगेश बोधले, सतीश पवार, पोलिस वाहनाचे चालक अवघडे, सतीश पवार, ग्रामरक्षक दलाचे पथक यांच्यासह इतर पोलिस कर्ममचारी व महामार्ग टोलनाक्‍याच्या कर्मचाऱ्यांनी इतर तीन रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे पाठविले. तर जो मृतदेह घेऊन रुग्णवाहिका चालली होती, त्या रुग्णवाहिकेत सकाळी 11 वाजपर्यंत मृतदेह तसाच आहे. पोलिसांनी मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक येत असल्याचे सांगितले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून, अधिक तपास हवालदार अविनाश शिंदे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An ambulance carrying a dead body met with a tragic accident at Mohol