बापरे ! जुगार अड्डा कारवाईतील जप्त रक्कम हडप; "त्या' पोलिसांवर कारवाईची होतेय मागणी

हुकूम मुलाणी 
Saturday, 5 September 2020

पाटखळ येथे काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल पैगंबर नदाफ व अतुल खराडे यांना मिळताच त्यांनी साध्या गणवेशात जाऊन 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्या वेळी दिगंबर माने, प्रवीण लेंडवे, उमेश कोळी, विजय रायभान यांच्याकडून पोलिस कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम 72 हजार 300 जप्त केली होती. 

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील पाटखळ येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 72 हजार 300 हजार रक्कम जप्त केली; मात्र गुन्हा नोंदीत 1850 रुपये दाखवून 70 हजार 450 रुपये हडप केल्याची तक्रार दिगंबर माने, प्रवीण लेंडवे, तानाजी गोडसे (रा. पाठखळ) यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्याकडे केली. खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बोकड पार्टीला नेल्याची घटना ताजी असताना, जुगार अड्ड्यावरील कारवाईतील रकमेतील फरकाने आता पुन्हा खळबळ उडाली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पाटखळ येथे काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल पैगंबर नदाफ व अतुल खराडे यांना मिळताच त्यांनी साध्या गणवेशात जाऊन 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्या वेळी दिगंबर माने, प्रवीण लेंडवे, उमेश कोळी, विजय रायभान यांच्याकडून पोलिस कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम 72 हजार 300 जप्त केली होती. पंचांसमक्ष पैशाचे मोजमापही केले. आंधळगाव रोडवरील ओढ्याजवळ नेऊन कारवाई टाळण्यासाठी पैशाची मागणी केली. यात गावातील पोलिस मित्र व वसुली करून देणाऱ्या एकाने मध्यस्थी केली. 

पोलिसांनी सर्व आरोपींना पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यावर सायंकाळी सहा वाजता सह्या घेऊन "तुमच्यावर केस होणार नाही' असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीत 72 हजार 300 रुपये जप्तीची रक्कम असताना प्रत्यक्षात मात्र आरोपींकडून 1850 रुपये जप्त केल्याचे दाखविण्यात आले. उर्वरित रक्कम 70 हजार 450 रुपये या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. दरम्यान, आरोपीला तुमच्यावर कारवाई करणार नसल्याचे सांगून या पोलिसांनी 15 हजार रुपये घेतले. यात गावातील एकाने मध्यस्थी केली असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The amount of gambling dens seized by the police was shown to be low