तानाजी सावंतांच्या "या' वक्तव्याचा सोशल मीडियावर संताप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

"मी कोणालाही जुमानत नाही. वेळ पडल्यास शिवसेना सोडेन. मराठवाड्याच्या विकासाआड येऊ नका. माझ्या भागातील नागरिकांना जे आश्‍वासन दिले आहे ते पूर्ण करणार आहे,' असे भाष्य करत, केंद्राचे सरकार भरवशाचे असून, उजनीचे पाणी मराठवाड्याला मिळाले पाहिजे, त्यासाठी आपण काहीही करायला तयार असल्याचे तानाजी सावंत म्हणाले.

सोलापूर : उद्धव ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केल्याची क्‍लिप व्हायरल होताच सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सावंत म्हणतात केंद्र सरकार भरवशाचे
महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सरकारमध्ये तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात भेट झाली होती. मात्र, त्या भेटीनंतरही त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी, "मी कोणालाही जुमानत नाही. वेळ पडल्यास शिवसेना सोडेन. मराठवाड्याच्या विकासाआड येऊ नका. माझ्या भागातील नागरिकांना जे आश्‍वासन दिले आहे ते पूर्ण करणार आहे,' असे भाष्य करत, केंद्राचे सरकार भरवशाचे असून, उजनीचे पाणी मराठवाड्याला मिळाले पाहिजे, त्यासाठी आपण काहीही करायला तयार असल्याचे सावंत म्हणाले.

सावंत यांच्या विधानाने रंगल्या चर्चा
विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात अनेक शिवसैनिक नाराज होते. त्यातच मंत्रिमंडळातही सावंत यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या. अशा परिस्थितीत सावंत यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या विधानाने खळबळ माजली असून, सोशल मीडियावर मात्र संताप व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger over on Tanaji Sawant statement