esakal | अन्न मिळाले तरच चालेल घर; लॉकडाउनमुळे कमाईच्या हंगामात काम बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Anger of workers in the Rajyasthan state in Solapur

"बाबूजी हमारा चालीस लोगोंका परिवार है! अभी तक मूर्तीया बेचकर कमाई होती थी! अब तो कमाई नही है, और पकानेके लिये अनाज भी नही मिल रहा है! कुछ अनाज मिल जाये तो हम लॉकडाउन में भी घर चला सकेंगे', अशा शब्दांत रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील मूर्ती कारागिरांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. 

अन्न मिळाले तरच चालेल घर; लॉकडाउनमुळे कमाईच्या हंगामात काम बंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : "बाबूजी हमारा चालीस लोगोंका परिवार है! अभी तक मूर्तीया बेचकर कमाई होती थी! अब तो कमाई नही है, और पकानेके लिये अनाज भी नही मिल रहा है! कुछ अनाज मिल जाये तो हम लॉकडाउन में भी घर चला सकेंगे', अशा शब्दांत रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील मूर्ती कारागिरांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. 
रेवणसिद्धेश्‍वर मंदिराच्या परिसरात राजस्थानमधील या मूर्ती कारागिरांची वस्ती आहे. 40 जणांचा हा परिवार आहे. त्यांची पाच ते सहा घरे या ठिकाणी आहेत. 20 वर्षांपासून हे लोक या ठिकाणी राहतात. अनेक प्रकारच्या मूर्ती ते पीओपीपासून तयार करतात. राजस्थानातून ही माती विकत आणली जाते. गणेश मूर्ती तयार करण्याचा त्यांचा मुख्य कमाईचा हंगाम असतो. मूर्ती तयार केल्यानंतर आजूबाजूच्या गावांतून विक्रेते त्यांच्याकडून मूर्ती घेऊन जातात. याशिवाय इतर अनेक महापुरुषांच्या मूर्ती, सजावटीचे साहित्य देखील ते तयार करतात. 
गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. साच्यातील मूर्ती तयार करून झाल्या आहेत. मात्र लॉकडाउनमुळे सर्व काम अडकले. तसेच पुढे गणेशोत्सवात नेमक्‍या किती मूर्ती विकल्या जातील, याची िंचंता या कारागिरांना पडली आहे. सध्या तरी लॉकडाउनमध्ये त्यांना कोणतीच मूर्ती विक्रीची कमाई झालेली नाही. इतर विक्रेत्यांकडून देखील कोणतीच मागणी आलेली नाही. त्यामुळे खाण्यापिण्याच्या अडचणी झाल्या. 
त्यांच्याजवळ रेशन कार्ड देखील नाही. रेशन कार्डाशिवाय देखील गरजूंना धान्य मिळते, अशी माहिती मिळाली म्हणून हे कारागीर जवळच्या स्वस्त धान्य दुकानात गेले. तेव्हा दुकानदाराने धान्य देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी त्याची किंमत देतो, पण धान्य द्या अशी विनंती केली. पण त्यांना धान्य मिळाले नाही. तेव्हा काही घरांतील महिलांनी दागिने विकून काही पैसे जमा करून कसेबसे धान्य आणले. पण पुन्हा लॉकडाउन वाढले. एक दिवस कुणीतरी एका दिवसाचे जेवण दिले, पण तेही लहान मुले जास्त असल्याने फारसे पुरेसे नव्हते. भोजनाच्या मदतीपेक्षा धान्य मिळाले तर कसेही लॉकडाउनचे दिवस काढता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. 

पुन्हा अन्नधान्यासाठी पैसे नाहीत

आमची सर्व घरे मिळून 40 जणांचा परिवार आहे. मूर्तिकाम बंद झाले आहे. कुठूनही पैशाची आवक नाही. जवळचे पैसे व काही दागिन्यांवर थोडे फार चालवले. लॉकडाउन वाढविल्यामुळे आता पुन्हा अन्नधान्यासाठी पैसे नाहीत. निदान धान्य मिळाले तर कुटुंबाचे भागेल. 
- गणेश बिट्टू, मूर्ती कारागीर, रेवणसिद्धेश्‍वर मंदिर, सोलापूर