डांबरात कुठं मुरतयं पाणी? कार्यकारी अभियंता म्हणाले, मी नाही सर्वत्र लक्ष देऊ शकत 

अण्णा काळे
बुधवार, 1 जुलै 2020

करमाळा तालुक्‍यातील अंजनडोह ते पोंधवडी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भर पावसात डांबरीकरण सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधीचा निधी दिला जात असताना हा निधी अक्षरशः पाण्यात घातला जात आहे.

करमाळा (सोलापूर) : तालुक्‍यातील अंजनडोह ते पोंधवडी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भर पावसात डांबरीकरण सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधीचा निधी दिला जात असताना हा निधी अक्षरशः पाण्यात घातला जात आहे. विशेष म्हणजे याबाबत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके यांना विचारले असता मी सर्वत्र लक्ष देऊ शकत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे डांबरात पाणी कुठं मुरतयं? याची चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. 
सोमवारी (ता. 29) या भागात जोरदार पाऊस झाला. या भागात 53 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. असे असताना मंगळवारी ठेकेदाराने सकाळी डांबरीकरणाचे काम सुरू केले. विशेष म्हणजे मंगळवारी काम सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. सहा किलोमीटरपैकी चार किलोमीटरचे डांबरीकरण करण्यात आले आहे. काम सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या कामाच्या दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2018-19 मध्ये येथे रस्ता मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ तत्कालिन आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाला होता. 50 वर्षांत या रस्त्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते, त्यामुळे रस्ता होणार या आशेने या भागातील नागरिक खूष झाले. मात्र, हा रस्ता दर्जेदार झाला नाही तर किती दिवस हा रस्ता टिकणार हा प्रश्‍न या लोकांना पडला आहे. दीड वर्षापासून या रस्त्यावरचे काम सुरू आहे. याशिवाय खडकेवाडी फाटा ते झरे या रस्त्याचे देखील डांबरीकरण सुरू केले होते. ते काम येथील गावकऱ्यांनी पावसात काम करण्यास विरोध केल्याने मागील आठवड्यात बंद केले आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने अनेक ठिकाणाचे रस्ते खराब होत असतात अशा तक्रारी सर्वत्र होतात. असे असताना जर पावसाळ्यातच कोट्यवधी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याचे काम केले जात असेल आणि याला अधिकारी पाठीशी घालत असतील तर त्या कामाचा दर्जा कसा टिकणार हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 
पुणे येथील अधीक्षक अतुल चव्हाण म्हणाले, पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करता येत नाही. जर सध्या हे काम केले असेल तर हे काम संबंधित ठेकेदाराला पुन्हा एकदा करावे लागेल. याबाबत संबंधित रस्त्याच्या कामाची तत्काळ चौकशी केली जाईल. रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार होणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anjandhoh vihal Road work in Karmala taluka is of inferior quality