अंजुमन -ए- इस्लाम संस्थेचा सर सय्यद एक्‍सलेन्स पुरस्काराने सन्मान 

प्रमोद बोडके
Saturday, 17 October 2020

सोलापुरात सुरु होणार बी. फार्मसी 
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्यावतीने सोलापुरात व्यावसायिक अभ्यासक्रमासोबतच प्राथमिक ते हायस्कूलपर्यंत इंग्रजी माध्यमची शाळा सुरू आहे. होटगी येथे संस्थेच्यामार्फत या वर्षी फॉर्मसी व इतर पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेला पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष डॉ. जहीर काझी व सर्व संचालक मंडळाचे सोलापूर सेंटरचे को-ऑर्डिनेटर रियाज अहमद पीरजादे यांनी अभिनंदन केले आहे. 

सोलापूर : अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्यावतीने यंदाच्या वर्षीचा सर सय्यद एक्‍सलेन्स पुरस्कार अंजुमन - ए - इस्लाम संस्थेला मिळाला आहे. 97 शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. आज झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर, रजिस्ट्रार अब्दुल हामीद (आपीएस), वेबमास्तर डॉ. फैजा अब्बासी, प्रा. शाहीद शकील यांची उपस्थिती होती. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचेवतीने अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

रोख एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अंजुमन-ए-इस्लाम ही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देत आहे. या संस्थेमधून एकाच वेळी सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. अभियांत्रिकी, युनानी मेडिसीन, आर्किटेक्‍चर, फार्मसी, हॉस्पिटलिटी, केटरिंग व हॉटेल मॅनेजमेंट, लॉ, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, होम सायन्स, टीचर्स ट्रेनिंग व इतर कौशल्य विकास कार्यक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम या संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात महाविद्यालय कार्यरत आहेत. कार्यक्रमाची सुरूवात कुराण पठण करून झाली. कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. मुजाहिद बेग यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anjuman-e-Islam honored with Sir Syed Excellence Award