बार्शी तालुक्‍यात कोरोनाचा दुसरा रुग्ण; 50 जण विलगीकरण कक्षात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

संपर्कातील सर्वांना केले क्वारंटाइन 
जामगाव (आ.) येथे चिखर्डेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व टीमने नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग, पल्स ऑक्‍सिमीटर, ग्लुकोमीटरच्या सहाय्याने तपासणी केली असून त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या वृद्धाच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
- डॉ. संतोष जोगदंड, तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शी 

बार्शी (जि. सोलापूर) : जामगाव (आ.) (ता. बार्शी) येथे मुंबई येथून मुलीच्या घरी आलेल्या वृद्धावर बोगस डॉक्‍टरने उपचार केल्यानंतर शहरातील तीन खासगी रुग्णालयांनी उपचारास नकार देताच ग्रामीण रुग्णालय येथून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले. या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून बार्शी तालुक्‍यात रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. 
मीरा भाईंदर, मुंबई येथून वडील जामगाव येथील मुलीच्या घरी ता. 16 रोजी आले. त्यांना सर्दी, खोकला, ताप जाणवत होता म्हणून गावातील एका डॉक्‍टरकडे उपचार करून दोन सलायन लावण्यात आल्या होत्या. या बोगस डॉक्‍टरने अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. वृद्ध रुग्णास ता. 21 रोजी जुलाब व अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने बार्शीतील तीन खासगी रुग्णालयांत त्यांच्या जावयाने दुचाकीवर नेले होते. पण त्यांना कोणीही दाखल करून घेतले नाही. परत घरी आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात ता. 25 रोजी सकाळी रिक्षाने त्यांना दाखल केले. त्यांचे स्वॅब घेण्यात आले. संशयास्पद वाटल्याने रुग्णास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले तर रुग्ण घेऊन आलेल्या रिक्षाचालकास क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
त्या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखर्डे यांनी त्या भागातील 60 घरांचा सर्व्हे केला आहे. तर बार्शी व वैराग येथील विलगीकरण कक्षात 50 नागरिकांना ठेवण्यात आले आहे. नागरिकांना त्रास झाल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गावामध्ये उपचार करणाऱ्या बोगस डॉक्‍टरला ग्रामीण रुग्णालय येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचा स्वॅब घेण्यात आला असून तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आला आहे. सोमवारी वैराग येथे कोरोना संसर्गाचा एक रुग्ण पुणे येथे पॉझिटिव्ह आढळताच तालुक्‍यात वातावरण ढवळून निघाले असताना जामगाव (आ.) येथे दुसरा रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another corona patient in Barshi taluka 50 in isolation ward