जुना कारंबा नाक्‍याजवळ थांबलेल्या ट्रकला पाठीमागून दुसऱ्या ट्रकची धडक ! दोघांचा जागीच मृत्यू 

अमोल व्यवहारे 
Wednesday, 23 December 2020

पुणे- हैदराबाद महामार्गावरील सोलापूर शहरातील जुना कारंबा नाका परिसरात असलेल्या डी-मार्ट समोरील रस्त्यावर रस्त्याच्या मध्ये मालट्रक थांबून दोरी बांधणाऱ्या दोघांना पाठीमागून भरधाव आलेल्या मालट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 22) रात्री पावणे दहाच्या सुमारास झाला. 

सोलापूर : पुणे- हैदराबाद महामार्गावरील सोलापूर शहरातील जुना कारंबा नाका परिसरात असलेल्या डी-मार्ट समोरील रस्त्यावर रस्त्याच्या मध्ये मालट्रक थांबून दोरी बांधणाऱ्या दोघांना पाठीमागून भरधाव आलेल्या मालट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 22) रात्री पावणे दहाच्या सुमारास झाला. ट्रक चालक भोसले (रा. दहिटणे) आणि सहानी (रा. बिहार) अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत. 

ट्रकचालक भोसले हा एमएच 16 - क्‍यू 3299 क्रमांकाच्या ट्रकमध्ये दोरी बंडल घेऊन जात होता. डी- मार्ट समोर आल्यानंतर त्याची दोरी तुटल्याने त्याने सहानी यांना बोलावून घेऊन रस्त्याच्या मध्येच ट्रकच्या पाठीमागील दोरी बांधण्यासाठी थांबला. भोसले यांच्या ट्रकला पाठीमागे रिफ्लेक्‍टर नव्हता की लाल रंगाची लाईट लागलेली नव्हती. त्यामुळे पाठीमागून भरधाव आलेल्या केए 32 - डीजी 6255 या क्रमांकाच्या ट्रक चालकाने ट्रक भरधाव चालवून समोर थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात चालक भोसले आणि सहानी नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत पोलिसांना माहिती मिळतात पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहाय्यक पोलिस आयुक्त रूपाली दरेकर, कमलाकर ताकवले, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांना शासकीय रुग्णालयात हलविले. अपघातानंतर कर्नाटकच्या ट्रकचा चालक पळून गेला आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

अपघातामुळे पुणे - हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून बाजूला घेत रात्री उशिरा वाहतूक सुरळीत केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another truck hit a truck parked near Old Karamba Naka