वाचा : संचारबंदीमध्ये तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचाबंदीबाबत अनेकांच्या मनात प्रश्‍न आहेत. त्याची प्रत्येक उत्तरे येथे मिळणार आहेत.

सोलापूर : कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचाबंदीबाबत अनेकांच्या मनात प्रश्‍न आहेत. त्याची प्रत्येक उत्तरे येथे मिळणार आहेत.

प्रश्‍न : औषध, भाजी किंवा किराणा घेण्यासाठी बाहेर पडायचे आहे. त्यासाठी पोलिस पास हवा का?
उत्तर : औषधे, भाजी, किराणा किंवा जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठी निश्‍चितच घराबाहेर जाता येईल. त्यासाठी पोलिस पासची गरज नाही.

प्रश्‍न : मला कामावर जायचे आहे त्यासाठी पोलिस पास लागेल का?
उत्तर : काही शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, पत्रकारांना त्यांचे कार्यालयीन ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. पोलिस पासची गरज नाही.

प्रश्‍न : मला नातेवाईक आणि मित्रांना भेटायला जायचे आहे, मला पोलिस पास लागेल का?
उत्तर : महाराष्ट्रात जमावबंदी संसर्गजन्य आजार प्रतिबंधात्मक कायदा संचारबंदी लागू आहे. अशा अवस्थेत घराबाहेर पडतात येत नाही.

प्रश्‍न : मला सहज फेरफटका मारून यावे असे वाटते काय करायचे?
उत्तर : शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अशा स्थितीत फेरफटका मारून येण्याचा विचारही करू नका. हे चुकीचे कृत्य आणि संचारबंदी भंग करण्याचा गुन्हा आहे. त्यासाठी कायदेशीर न्यायालयीन कारवाई होईल.

प्रश्‍न : मी ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधार आहे, मला जीवनावश्‍यक वस्तूंसाठी कोण मदत करेल?
उत्तर : ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधारांच्या मदतीसाठी सरकार अग्रेसर आहे. औषधे जीवनावश्‍यक वस्तूंसाठी ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधारांनी कंट्रोल रूमला फोन केल्यास किंवा ज्येष्ठांनी जेष्ठ नागरिक सेलला फोन करून मदत मागावी.

प्रश्‍न : मला बॅंकेत, एटीएममध्ये पैसे घ्यायला किंवा टाकायला जायचे आहे. मला पोलिस पासची गरज आहे का?
उत्तर : बॅंकेत, जवळच्या एटीएममध्ये किंवा फारच आवश्‍यक कामासाठी जायचे असल्यास पोलिस पासची गरज नाही. शक्‍यतेवर ऑनलाइन बॅंकिंगचा वापर करावा, पोलिसांनी थांबवलं तर त्या संदर्भात माहिती द्या, ते सहकार्याच्या भूमिकेत आहेत.

प्रश्‍न : मला ओळखपत्र म्हणून पोलिसांना किंवा अधिकाऱ्यांना काय दाखवावे लागेल.
उत्तर : घराबाहेर पडण्याचा उद्देश काय हेच महत्त्वाचे आहे. संचारबंदीत बाहेर फिरण्यावर प्रतिबंध आहे. रस्त्यावर जायचे नाही तर ओळखपत्रे दाखवायचे कोणतेही कारण नाही.

प्रश्‍न : पोलिस पास काढण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर : अत्यावश्‍यक असल्यास वैद्यकीय सेवेची गरज असल्यास संबंधित पोलिस स्टेशनला जाऊन पासची मागणी करता येईल. कामाचे स्वरूप बघून पोलिस ही व्यवस्था करून देतील. मेडिकल स्टोअर्स, नर्सेस, अन्य वैद्यकीय सेवा देणारे व्यक्तींना आपापले प्रतिष्ठान डॉक्‍टर किंवा संबंधित कार्यालयाचे ओळखपत्र पोलिसांना दाखवून कामाच्या ठिकाणी जाता येईल.

प्रश्‍न : मला रोज बाहेर पडायचे असेल तर पोलिस पास रोज काढावा लागेल का?
उत्तर : बाहेर पडायचे कशाला, उद्देश काय, डॉक्‍टर, पत्रकार असाल तर पासची गरज नाही.

प्रश्‍न : खाजगी वहान काढता येईल काय?
उत्तर : एसटी, मेट्रो, खासगी प्रवासी आदी सर्वच प्रवासी वाहने बंद करण्यात आली आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवेसाठी वाहतूक करणारे टॅक्‍सीचालक केवळ दोन प्रवासी घेऊन जाऊ शकतील. ऍटोचालक केवळ एक प्रवासीच घेऊन शकते, मात्र वैद्यकीय सेवेसाठी हे बंधन लागू असणार नाही.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Answering every question you have in communication