कोथिंबिरीचे दर गडगडले ! एक रुपयाला जुडी; उत्पादक शेतकरी मात्र घायाळ

राजाराम माने 
Friday, 20 November 2020

दोन महिन्यांपूर्वी 20 रुपये जुडीप्रमाणे विकली जाणारी कोथिंबीर आज मात्र एक रुपया जुडी या दराने विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक मात्र घायाळ झाला आहे. मजुरी तसेच वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादकांनी कोथिंबीर तशीच सोडून दिली आहे तर काही ठिकाणी गुरांना टाकली जाऊ लागली आहे. 

केत्तूर (सोलापूर) : दोन महिन्यांपूर्वी 20 रुपये जुडीप्रमाणे विकली जाणारी कोथिंबीर आता मात्र एक रुपया जुडी या दराने विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक मात्र घायाळ झाला आहे. मजुरी तसेच वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादकांनी कोथिंबीर तशीच सोडून दिली आहे तर काही ठिकाणी गुरांना टाकली जाऊ लागली आहे. 

मध्यंतरी चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. पोषक वातावरणामुळे ही कोथिंबीरही चांगली तरारून आली. आता ही कोथिंबीर बाजारात दाखल होत आहे आणि मागणी मात्र नाही. त्यातच दिवाळी सणामुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कोथिंबिरीचा दर मात्र मातीमोल झाला आहे आणि कोथिंबिरी पाठोपाठ इतर भाजीपाल्यांचे दरही कमी झाले आहेत. 

या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भाजीपाला पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे गत महिन्यात भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ - उतार पाहावयास मिळाले होते. 

कोथिंबिरीला चांगला दर मिळेल, या आशेने कोथिंबिरीची मुबलक प्रमाणात लागवड केली; परंतु सध्या चांगला दर मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे नुकसान होत आहे. 
- दादासाहेब पवार, कोथिंबीर उत्पादक, गुलमोहरवाडी 

भाजीची टेस्ट (चव) वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर आवर्जून केला जातो. मध्यंतरी कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला होता. आता कोथिंबीर स्वस्त झाल्याने सढळ हाताने भाजीत टाकता येत आहे. 
- उज्ज्वला निंभोरे, गृहिणी, केत्तूर 

मध्यंतरी कोथिंबिरीचे दर जरा जास्त झाल्याने मांसाहारांमध्ये कोथिंबीर वापरली जात नव्हती. आता दर गडगडल्याने ती सध्या वापरली जात आहे. त्यामुळे भाज्या चवदार व खमंग होत आहेत. 
- प्रवीण बागल, तरुण, केत्तूर 

आवक जास्त, मागणी कमीचा परिणाम 
कोथिंबिरीला पोषक वातावरण झाल्याने सगळीकडे कोथिंबीर तरारून आली आहे. परंतु बाजारात कोथिंबिरीची आवक जास्त आणि मागणी त्यामानाने कमी असल्याने कोथिंबिरीचे दर उतरले आहेत. मध्यंतरी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाला, फळभाज्या तसेच कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतात पाणी साचून राहिल्याने भाज्या सडून गेल्या. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाज्यांबरोबरच कोथिंबिरीचे दरही वाढले होते. त्यानंतर पुढेही कोथिंबिरीला चांगला दर राहील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्या रिकाम्या राहिलेल्या शेतामध्ये कोथिंबीर लागवडीलाच पसंती दिली. आता ही कोथिंबीर बाजारात येऊ लागल्याने कोथिंबिरीची आवक जास्त आणि त्यामानाने मागणी मात्र कमीच असल्याने कोथिंबिरीचे दर मात्र घसरले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anxiety spread among farmers due to fall in cilantro prices