गुरुजींच्या अधिवेशनासाठी हवी संचालकांची मान्यता 

संतोष सिरसट 
मंगळवार, 24 मार्च 2020

वर्षात एकाच अधिवेशनाला जाता येणार 
दीर्घ सुटीच्या कालावधीत एखाद्या संघटनेने अधिवेशन घेतल्यास गुरुजींना त्याला उपस्थित राहण्यासाठी नैमित्तिक रजा मंजूर केली जाणार आहे. पण, वर्षातून केवळ कोणत्यातरी एकाच संघटनेच्या अधिवेशनासाठी गुरुजींना रजेचा उपभोग घेता येणार आहे. अधिवेशनाला उपस्थित राहिल्याची खात्री केल्यानंतरच ती रजा मंजूर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

सोलापूर ः राज्यातील शिक्षक संघटनांनी त्यांचे अधिवेशन दीर्घ सुटीच्या कालावधीतच घ्यावे, अशा सूचना शासनाने 15 सप्टेंबर 2014 च्या निर्णयान्वये दिल्या आहेत. मात्र, आता त्यामध्ये आणखी एक भर म्हणजे या अधिवेशनासाठी प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षण संचालकांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. दीर्घ सुटीच्या व्यतिरिक्त इतर कालावधीत अधिवेशन घेण्यास परवानगी न देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

नुकतेच एका संघटनेला अधिवेशन घेण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. सप्टेंबर 2014 च्या शासन आदेशानुसार दीर्घ सुटीच्या कालावधीत अधिवेशन घेण्याच्या सूचना असतानाही त्या संघटनेला अधिवेशन घेण्यास परवानगी दिली होती. मात्र, देशात व राज्यात निर्माण झालेल्या कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर ते अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. कदाचित त्यावरून बोध घेत शिक्षण विभागाने कोणत्याही परिस्थितीत अधिवेशन हे दीर्घ सुटीच्या कालावधीतच घेण्याच्या सूचना देताना त्याला शिक्षण संचालकांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. दीर्घ सुटीच्या कालावधीव्यतिरिक्त इतरवेळा अधिवेशन घेण्यासाठीचे प्रस्ताव सादर झाल्यास ते प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठीही सादर न करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने नव्याने दिल्या आहेत. तरीही असे प्रस्ताव शासनाकडे आल्यास शासन त्या प्रस्तावांचा विचारही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या संघटनेचे अधिवेशन होणार आहे, ती संघटना मान्यताप्राप्त असणे आवश्‍यक आहे. अधिवेशन घेणाऱ्या संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र व इतर आवश्‍यक कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approval of the directors required for the convention of the teacher